स्‍वस्‍थ भारत बनविण्‍यासाठी केंद्र सरकार कटीबध्‍द -केंद्रीय आरोग्‍य मंत्री डॉ. मनसुख मंडविया

0
177

 

 जामखेड न्युज——

स्‍वस्‍थ भारत बनविण्‍यासाठी केंद्र सरकार कटीबध्‍द -केंद्रीय आरोग्‍य मंत्री डॉ. मनसुख मंडविया

देशात उत्‍तम प्रकारच्‍या सर्व आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध करून स्‍वस्‍थ भारत बनविण्‍यासाठी केंद्र सरकार कटीबध्‍द असल्‍याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण, रसायने व खते मंत्री डॉ. मनसुख मंडविया यांनी केले. येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल फाऊंडेशन, मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे आयोजित कॅन्‍सर सेंटर, न्‍युक्लियर मेडिसिन सेंटर, उद्घाटन समारंभात डॉ. मंडविया बोलत होते. यावेळी डॉ. मंडविया यांच्‍या हस्‍ते राळेगणसिध्‍दी येथे प्राथमिक आरोग्‍य केंद्राचा पायाभरणी व पढेगांव येथे नव्‍याने उभारण्‍यात आलेल्‍या प्राथमिक आरोग्‍य केंद्राचे लोकार्पण दुरदृष्‍य प्रणालीद्वारे करण्‍यात आले.


कार्यक्रमाला राळेगणसिध्‍दी येथुन दुरदृष्‍य प्रणालीद्वारे ज्‍येष्‍ठ समाजसेवक, पद्मभुषण आण्‍णा हजारे, तर कार्यक्रम स्‍थळी खा. डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपति डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. विखे पाटील फाऊंडेशनचे विश्‍वसत वसंत कापरे आदी मान्‍यवर यावेळी उपस्थित होते.
केंद्रीय आरोग्‍य मंत्री डॉ. मनसुख मंडविया पुढे म्‍हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्‍या नेतृत्‍वाखाली देश अनेक क्षेत्रात प्रगती करत असून देशाच्‍या आरोग्‍य व्‍यवस्‍थेला विकासाशी जोडल्‍याने देशातील आरोग्‍य व्‍यवस्‍थेत अमुलाग्र बदल होत आहेत. स्‍वस्‍थ व सक्षम भारत बनविण्‍यासाठी सरकार प्रयत्‍न करत आहे.

चांगली जीवनशैली विकसित करण्‍यासाठी केंद्र सरकारतर्फे देशात 1 लाख 25 हजार वेलनेस सेंटर उभारण्‍यात आले असून येत्‍या काळात 25 हजार वेलनेस सेंटर निर्माण करण्‍यात येणार आहे. देशात मेडिकल टुरिझम हब बनविण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न करणार असून वैद्यकिय शिक्षणांसाठी विद्यार्थ्‍यांच्‍या जागा सुध्‍दा वाढविण्‍यात येतील. ‘आत्‍मनिर्भर भारत’ या संकल्‍पनेत संशोधनाच्‍या माध्‍यमातुन देशातील नवयुवकांना विविध क्षेत्रात संधी उपलब्‍ध करून देण्‍यात येत आहे. देशांतील गरीब व्‍यक्‍ती व शेतकरी यांच्‍या कल्‍याणासाठी तसेच उद्योग क्षेत्राचा विकास या तीन प्रमुख गोष्‍टींवर सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे असे त्‍यांनी सांगितले.


राळेगणसिध्‍दी येथे नव्‍याने उभारण्‍यात आलेल्‍या प्राथमिक आरोग्‍य केंद्राचे दुरदृष्‍य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्‍यात आले. यावेळी ज्‍येष्‍ठ समाजसेवक आण्‍णा हजारे यांनी नवीन सर्व सुविधांयुक्‍त प्राथमिक आरोग्‍य केंद्र उपलब्‍ध करून देणार असल्‍याबद्दल माजी केंद्रीय आरोग्‍य मंत्री व केंद्रीय आरोग्‍य मंत्री डॉ. मंडविया यांचे आभार मानले. आणि केंद्रीय आरोग्‍य मंत्र्यांना राळेगणसिध्‍दी गावांत येण्‍याचे आमंत्रण दिले. केंद्रीय आरोग्‍य मंत्री डॉ. मंडविया यांनी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलची पाहणी करून रुग्‍णांची आस्‍थेवाईकपणे विचारपूस केली.


प्रास्‍ताविकात डॉ. सुजय विखे पाटील म्‍हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली देश सर्व क्षेत्रात प्रगती करत असून आरोग्‍य क्षेत्रातसुध्‍दा मोठे काम होत आहे. अहमदनगर जिल्‍ह्यात नागरीकांना आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध करून दिल्‍या जात आहे. उत्‍तर महाराष्‍ट्रात पहिलेच न्‍युक्लियर मेडिसिन सेंटर, पेट स्‍कॅन सेंटर अहमदनगर येथे उभारण्‍यात आले आहे. लवकरच मदर चाईल्‍ड हेल्‍थ हॉस्पिटल उभारण्‍यात येणार असुन आगामी वर्षात जिल्‍ह्यात विविध आरोग्‍य सुविधा संदर्भात 47 कोटी रुपयांचे प्रकल्‍प पूर्ण करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

कार्यक्रमाला जिल्‍हा परिषद सदस्‍य पदाधिकारी वैद्यकिय महाविद्यालयाचे विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी आभार व्‍यक्‍त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here