जामखेड न्युज——
पीके पाण्यात शेतकरी हवालदिल, तरीही ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही-कृषीमंत्री
राज्यातील बहुतेक भागातील पीके पाण्यात आहेत. रब्बी पेरणी नाही तरीही राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही असे धक्कादायक वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे.
राज्यात परतीच्या पावसामुळे मोठं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशात शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी असे आदेश दिले आहेत. मात्र अजून ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तसंच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंचनामे आणि भरपाईचे आदेश दिले. मात्र राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, असं विधान राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. ज्या भागात नुकसान झालं आणि त्या भागाचे पंचनामे केल्यावर किती नुकसान झालं ते समजेल, असंही सत्तार म्हणाले.
परतीचा पाऊस पहिल्या वर्षी झाला असं नाही. प्रत्येक वेळी तो पडतो, त्याचा अंदाज लावता येत नाही, असंही सत्तार म्हणाले. आमच्याकडे शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती येत आहे. पंचनामे झाल्यावर नुकसानीचा आकडा कळेल, त्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळेल, कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन सत्तार यांनी दिलं आहे. आत्तापर्यंत सरकारने साडेपाच हजार कोटी रुपयांनी नुकसान भरपाई दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.