जामखेड न्युज——
पंडित बीडच्या राजकारणातील `भीष्माचार्य`
शिवाजीराव पंडित नाबाद ८५
जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात जेष्ठ असलेले माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी वयाची ८५ वी पुर्ण केली असली तरी राजकीय, सामाजिक, शिक्षण आदी क्षेत्रांतील त्यांचा वावर कायम आहे. या वयातही मराठा आरक्षणाबाबत सर्वव्यापी आंदोलन असेल तर कुस्तीच्या फडात हालगी वाजल्यानंतर पैलवानाच्या भाया जशा फुरफुराव्यात तसे शिवाजीराव पंडित यांचे होते.

हातात भगवा झेंडा घेऊन तरुणांच्या पुढे आंदोलनात सहभागी होणारे शिवाजीराव ‘अरे बेट्यांनो कायदा हाती घेऊ नका, पण गप्प बसूनही भागणार नाही`, अशी आरोळी ठोकत असतात. म्हणूनच त्यांना बीडच्या राजकारणातील ‘भिष्माचार्य’अशी बिरुदावली चाहत्यांकडून लावली गेली आहे.

वयाच्या २५ व्या वर्षी राजकीय फडात उतरुन ५० वर्षे सक्रीय राजकारणात राहीलेल्या शिवाजीराव पंडित यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी स्वत:हून निवृत्ती जाहीर केली. आता ८५ वर्षीय शिवाजीराव पंडित सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले असले तरी शेती, समाजकारण, अधात्मिक कार्यात पुढे असतात. स्वत: उत्तम शेती करणारे शिवाजीराव पंडित शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन शेतीचे धडेही देतात.

औरंगाबादला कायदा पदवीचे शिक्षण सुरु असताना त्यांचे चुलते दिवंगत सयाजीराव पंडित यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते गेवराईला आले. सयाजीराव पंडित विजयी झाल्यानंतर १९६२ साली त्यांनी धोंडराई गटातून जिल्हा परिषद निवडणुक लढवून ते विजयी झाले. गेवराई पंचायत समितीचे सभापती व सहा वर्षे ते जिल्हा परिषदेचे अध्यक्षही राहीले. त्यानंतर १९७८ ते ९५ असे तीन वेळा आमदार राहीले.

दरम्यान, त्यांनी साधारण २० वर्षे जिल्हा जिल्हा परिषदेवर पकड कायम ठेवली. त्यांना मंत्रीमंडळात रोहयो, जलसंधारण, सेवा योजजना, फलोत्पादन, कृषी, ग्रामविकास आदी महत्वांच्या खात्याचे राज्यमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली. विद्युत मंडळाचे सदस्य, राज्य गृह वित्त महामंडळाचे संचालक अशा विविध पदांवरही त्यांनी काम केले. पक्षीय संघटनेतही त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य पदांवरही त्यांनी काम केले.

राजकारणात सर्वाधिक काळ शरद पवारांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या शिवाजीराव पंडित यांनी एस. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेतही पवारांची साथ दिली. त्यांच्या राकारणावर पवारांसह दिवंगत यशवंतराव चव्हाण, दिवंगत सुधाकरराव नाईक यांचा प्रभाव राहीला असला तरी शिवाजीराव पंडित यांनी शेवटपर्यंत सासरे आणि मोहोळचे (सोलापूर) दिवंगत आमदार बाबूराव पाटील अनगरकर यांनाच राजकीय गुरु मानले. त्यांच्या पुढाकाराने बीड – परळी उच्चदाब वीज वितरण वाहीनीची उभारणी बीडसाठी मोठी उपलब्धी ठरली.
जायकवाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यासाठी त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा केला. गेवराई तालुक्यातून ७६ किलोमिटर लांबीच्या गेलेल्या कालव्यामुळे २५ हजार हेक्टर जमिन सिंचनाखाली आली. तालुक्यात दळणवळणासाठी रस्ते, लघूसिंचन तलाव व पाझर तलावांची कामे केली. सेवा योजना मंत्री म्हणून त्यांनी सुशिक्षीत बेरोजगारांना संधी मिळावी यासाठी जिल्हा उद्योग केंद्रांत एक खिडकी योजना सुरु करुन स्वावलंबन योजनेची अंमलबजावणी केली.
कृषी राज्यमंत्री म्हणून काम करताना सहकारी संस्थांना अर्थसहाय्य देण्याचा आणि ठिबक सिंचन योजनांना अनुदानाचा क्रांतीकारी निर्णयही या काळातच झाला. कबड्डी आणि व्हॉलीबालचे उ्तम खेळाडू असलेल्या शिवाजीराव पंडित यांनी राज्य संघाचे प्रतिनिधित्व करताना आंतरराज्य व्हॉलीबॉल स्पर्धेत राज्याला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवून दिले. विद्यापीठ संघाचे नेतृत्व करतानाही त्यांनी अनेक पदके पटाकवतानाच व्हॉलीबॉल खेळाचे राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांचा गौरव झाला.
सध्याही ते महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष तर जिल्हा कबड्डी आणि व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांचे यशस्वी राजकारण, समाजकारण, शिक्षण, सहकार क्षेत्रातील दबदबा आणि राजकारणात दिलेल्या शब्दाला जागे राहण्याची वृत्ती यामुळे त्यांना बीडच्या राजकारणातले ‘भिष्माचार्य’अशी बिरुदावली लागली आहे. विरोधी पक्षातले नेतेही आदराने त्यांचा याच शब्दाने उल्लेख करतात.
रजनी पाटलांच्या डोक्यावर चांदीची टोप..
शिवाजीराव पंडित यांची ओळख राजकारणात दिलेला शब्द पाळणारे अशी आहे. पुतणे बदामराव पंडित यांच्याकडून झालेले बंड व पराभवाला दिवंगत नेते अंकुशराव टोपे आणि दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांचे पाठबळ होते. त्यामुळे या दोघांचा पराभव घडविल्याशिवाय डोक्यावर टोपी घालणार नाही असा पण त्यांनी केला. पक्षातीलच या दोघांचाही पराभव घडवूनच त्यांनी स्वत:चे पराभवाचे उट्टे काढले. केशरबाई क्षीरसागर भाजपकडून पराभव करणाऱ्या रजनी पाटील यांच्या डोक्यावर त्यांनी चांदीची टोपी घातली व मगच स्वत:च्या डोक्यावर टोपी चढविली.
गोदावरी आणि सिंदफणेच्या कुशीतील गेवराईची सिंचनाच्या दृष्टीने समृध्द तालुका अशी ओळख आहे. शेतकऱ्यांना ऊसासारख्या नगदी पिकाचे मोठे आकर्षण होते. त्यामुळे शिवाजीराव पंडित यांनी जयभवानी सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. जयभवानी उभा रहावा म्हणून त्यांनी १९७२ च्या निवडणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांना गेवराई मतदार संघातून बिनविरोध निवडून दिले. कारण, मंत्री असलेल्या दिवंगत सोळंके यांचा केज मतदार संघ तेव्हा राखीव झाला होता. त्यामुळे या भागातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्नही मार्गी लागला.
त्यांनी जयभवानी आणि जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळांच्या माध्यमातून शाळा – महाविद्यालयांची उभारणी करत या भागात शिक्षणाची गंगोत्रीही आणली. त्यांच्याच प्रयत्नामुळे गढी (ता. गेवराई) येथे जवाहर नवोदय विद्यालयही उभारले. माऊली सहकारी सुतगिरणी, भवानी अर्बन बँक, जयभवानी उपसा सिंचन संस्था, गोदावरी मध्यवर्ती सहकारी भांडार आदी संस्थांचीही त्यांनी उभारणी केली.
राजकारणातील निवृत्तीनंतर आता त्यांनी शेतीत लक्ष घातले आहे. मोसंबी, अंबा, पेरु अशा फळबागांची लागवड केली असून त्यांनी उत्पादित केलेला अंबा परदेशात विक्री झाला. संकरीत गाईंचेही संगोपन ते करतात. सेंद्रीय आणि फळबागाच आता बदलत्या काळात शेतकऱ्यांना तारतील असे धडे ते शेतकऱ्यांना देतात.




