“मी पुन्हा येईन’चे स्वप्न जीवंत ठेवण्यासाठी हा खटाटोप – आमदार रोहित पवार”

0
239
जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल. गृहमंत्री महोदयांनी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या ‘प्रेस बाईट’चे व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविलवाणा प्रयत्न केला यातून त्यांच्या मनात ‘मी पुन्हा येईन’चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं प्रतीत होतं, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये भाजपने वेगवेगळ्या प्रकरणावरून महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. अधिवेशनादरम्यान, संजय राठोड, वीज बिलावरून भाजप आक्रमक झाली होती. त्यानंतर आता सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्या गृहमंत्री अनिल देशमुखांवरील आरोपांनी ठाकरे सरकार अधिकच अडचणी सापडले. यावरून आता रोहित पवारांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
रोहित पवार म्हणाले की, गृहमंत्र्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितलं असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आक्षेप घेतला. पण त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी 4 नोव्हेंबर 2020 रोजी दवाखान्यातून डिस्चार्ज घेतानाचे ट्विट केलेले फोटो बघावेत आणि मग आपल्या आक्षेपाचा विचार करावा.
महाराष्ट्राच्या हक्कांवर गदा येत असताना जे कधी एक शब्दही बोलले नाहीत ते आज महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी संसदेत आक्रमक झालेले दिसले. केवळ राजकीय पतंग न उडवता महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं तर महाराष्ट्र नक्कीच आपला अभिमान बाळगेल, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. संसदेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची झालेली मागणी, राज्यात विरोधी पक्षनेत्यांनी केलेले ट्विट्स, काहींनी राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी या  गोष्टी बघता विरोधी पक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झालाय, हे सगळ्या महाराष्ट्राने आज पाहिलं, अशी टीका रोहित पवारांनी केली.
हातात अधिकार असताना काहीही न बोलणारे पदावरून हटवताच बेछूट आरोप करत सुटतात, याचा अर्थ काय समजावा? आज हा अधिकारी दिल्लीत कोणाला भेटला? नंतर सर्वोच न्यायालयात याचिका दाखल करत सीबीआय चौकशीची मागणी का करतो? तो स्वतः बोलतोय की कुठली राजकीय शक्ती एखाद्या राजकीय हेतूपोटी या अधिकाऱ्याकडून हे सगळं वदवून घेतेय, अशी शंका निर्माण होत आहे, असे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले आहेत.
अनैतिक मार्गांने सरकार पाडणं शक्य होत नसल्याने बेछूट आरोप करून सरकारविषयी जनतेच्या मनातली आपलेपणाची भावना नाहीशी करण्याचा विरोधी पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिलाय. आरोप असतील तर चौकशी होऊन सत्य समोर येईलच, परंतु सत्तेसाठी कुठल्या थराला जायचं याचा विचार मात्र विरोधकांनी करावा, अशा शब्दात रोहित पवारांनी भाजपवर हल्ला चढवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here