भगरीच्या साठवलेल्या पिठाला पावसाळ्यात बुरशी, त्याची भाकरी खाल्ल्यास होते विषबाधा , भगर खरेदी करताय तर तारीख पाहा, पक्के बिल घ्या -अन्न व औषध प्रशासन अधिकारी

0
215

 

जामखेड न्युज——

भगरीच्या साठवलेल्या पिठाला पावसाळ्यात बुरशी, त्याची भाकरी खाल्ल्यास होते विषबाधा ,
भगर खरेदी करताय तर तारीख पाहा, पक्के बिल घ्या -अन्न व औषध प्रशासन अधिकारी

सध्या नवरात्र उत्सव सुरू असलेल्याने अनेकांना उपवास आहेत. शेजारी बीड जिल्ह्यातील अनेक विषबाधा प्रकरणे समोर आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने व्यापारी वर्गाला योग्य सूचना दिल्या आहेत. तरीही ग्राहकांनी भगर, तांदूळ, पीठ खरेदी करताना त्याची तारीख पाहवी, पक्के बील घ्यावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

भगरीचे पीठ दळून आणल्यानंतर ते तीन दिवसांच्या आत त्याची भाकरी करून खावी, पीठ साठवून ठेवूच नये. कारण पावसाळ्यात साठवून ठेवलेल्या पिठाला बुरशी येऊन त्यातून विषबाधा होत असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

दरम्यान, जिल्ह्यात भगरीच्या पिठातून विषबाधेच्या घटना समोर आल्यानंतर बुधवारी बीड जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने बीड शहरासह गेवराई अशा दोन ठिकाणच्या एजन्सीवर छापे मारून एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीची २ हजार ९८ किलो भगर जप्त केली, तर त्याचे नमुने मुंबई येथील प्रयोगशाळेला पाठवले आहेत.

गेवराई तालुक्यातील उमापूर येथील व्यापारी अजित अशोक कुमार पाटणी यांच्या पाटणी किराणा स्टोअर्सवर बुधवारी सांयकाळी साडेसहा वाजता अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक छापा मारून २४ हजार ७०० रूपये किंमतीचे १३ पाेते भगर जप्त केली आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याच्या अगोदर भगरीचा पुरवठा करणारी नाशिक येथील फॅक्टरी अगोदर सील करा, अशी मागणी व्यापारी महासंघाने केली आहे.

बुधवारी शहरातील मोंढा भागातील व्यापारी प्रतिक खिवंसरा यांच्या आेम एजन्सीवर छापा मारून १ लाख ६० हजार रुपयांची १८०० किलो भगर, तर गेवराई येथील मोंढा भागातील व्यापारी शितल एजन्सीवर छापा मारून २० हजार ८६२ रुपयांची २९८ किलो भगर अशी एकूण १ लाख ८० हजार रुपयांची २ हजार ९८ किलो भगर जप्त करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणचे भगरीचे नमुने घेण्यात आले आहे.

शिळी भगर का खाऊ नये ?
बाजारात आजकाल भगरीचे मोकळे पीठ विकत मिळते. ते विकत घेऊ नये. घरी सकाळी तयार केलेली भगरीची भाकरी संध्याकाळी खाऊ नये, रात्रीची शिळी भगर खाऊ नये विषबाधा होण्याची दाट शक्यता असते.

पावसाळ्यात का खाऊ नये भगरीचे पीठ ?
जर भगरीचे पीठ घरी दळले तर ते घरात व्यवस्थित झाकून ठेवले पाहीजे. कारण ते पीठ तीन दिवसांत खराब होते. दळलेल्या भगरीच्या पिठाला सध्या पावसाळ्याच्या दिवसांत बुरशी येते. त्यातून विषबाधा होते.

भगर शिजवूनच का खावी ?
बाजारात नागरिकांनी भगर खरेदी केल्यानंतर ती घरी शिजवून खावी. जर भाकरी करायची असेल तर भगर घरीच दळावी. परंतु भगरीचे पीठ साठवून ठेवू नये अथवा सकाळी केलेली भगर रात्री खाऊ नये.

भगर खरेदी करताय तर तारीख पाहा, पक्के बिल घ्या
नागरिकांना सुचित करण्यात येते की, नागरिकांनी सीलबंद भगरच खरेदी करावी. खरेदी करतांना त्यावरील तारीख पाहून खरेदी करावी, व्यापाऱ्याकडून पक्के बिल घ्यावे. भगर किंवा इतरही उपवासाच्या पदार्थांची खरेदी अधिकृत विक्रेत्यांकडून आणि पॅकबंद पदार्थांचीच खरेदी करावी. बनावट पदार्थ बाजारात येण्याची शक्यता अधिक असते.
-उमेश सुर्यवंशी,अन्न औषध निरीक्षक नगर

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here