जामखेड न्युज——
आपदा मित्र’ नोंदणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अहमदनगर यांच्यामार्फत अहमदनगर जिल्ह्यात ‘आपदा मित्र’ योजना राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील पाचशे स्वयंसेवकांची आपदा मित्र म्हणून निवड करण्यात येणार आहे. आपदा मित्रांना 8 ते 10 दिवसांचे निवासी आपत्कालीन प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षित आपदा मित्रांना ओळखपत्र, गणवेश तसेच आपत्कालीन प्रतिसाद किट (Emergency Response Kit) देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे केले आहे.
आपदा मित्र नेमणूकीसाठी उमेदवार 18 ते 40 वयोगटातील असावा. माजी सैनिक, सेवानिवृत्त वैदयकीय व्यावसायिक, स्थापत्य अभियंते यांना वयाचा निकष शिथिल केला जाऊ शकतो. उमेदवार जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असावा, तो किमान सातवी पास असावा, त्याचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
त्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक असून आपत्ती प्रतिसाद कार्यात स्वयंसेवा करण्याचा पूर्वीचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. महिलांचा पंचवीस टक्के सहभाग असावा. नेहरू युवा केंद्र, एनसीसी,एनएसएस व भारत स्काऊट गाईड यांच्यामधून वीस टक्के नोंदणी करण्यात येईल. सेवानिवृत्त सैनिक, अग्निशमन विभाग, होमगार्ड, सिव्हील डिफेन्समध्ये कार्यरत व्यक्तींना भरतीमध्ये प्राधान्य दिले जाईल. अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, स्वेच्छेने आपदा मित्र म्हणून आपली नोंदणी करण्यासाठी कृपया ahmednagar.nic.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeGnjyOiiLEr2GrVRa76YS8FycPJ1Nlw6nGpfDMHyeQQJdJnQ/viewform या लिंकव्दारे गुगल फॉर्म भरावा. सदर गुगल फॉर्मची लिंक ahmednagar.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.