जामखेड न्युज——
खरेच्या गुणवत्तेला अजय- अतुलचा परीसस्पर्श
नगरचा सहावीतील जयेश खरे गाणार अजय- अतुल बरोबर, जयेशची मोठी झेप
अखेर अजय-अतुलपर्यंत पोहोचला त्याचा आवाज! ‘चंद्रा’मुळे Viral झालेल्या अहमदनगरच्या जयेशची मोठी झेप
शाहीर साबळेंच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटामध्ये छोट्या शाहीरांचे गाणे गाण्यासाठी ‘चंद्रा’ गाण्यामुळे व्हायरल झालेल्या चिमुरड्याला संधी मिळाली आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’चे संगीतकार अजय-अतुल यांनी सोशल मीडियावर हिरो ठरलेल्या जयेश खरेला ही संधी दिली आहे.
‘महाराष्ट्राचे शाहीर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष ३ सप्टेंबर रोजी सुरु झाले आहे. या दरम्यान त्यांच्या जीवनावर आधारित ‘महारष्ट्र शाहीर’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान या सिनेमामध्ये अजय-अतुल यांचे संगीत असणार आहे. आता याविषयी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. या सिनेमात छोट्या शाहीर साबळेंच्या आवाजातील गाणे कोण गाणार हे समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हायरल झाला होता. एक शाळकरी मुलगा विद्यार्थ्यांच्या घोळक्यात बाकाजवळ उभा राहून ‘चंद्रा’ गाणं गाताना दिसत होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. अनेक सेलिब्रिटींनीही हा व्हिडिओ शेअर केलेला. हा व्हिडिओ होता जयेश खरे या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा. जयेशला यानंतर विशेष प्रसिद्धी मिळाली. माध्यमंही त्याच्यापर्यंत पोहोचली. आता जयेशपर्यंत थेट अजय-अतुल पोहोचले असून त्याचा आवाज सामान्यांपर्यंत मोठ्या स्तरावर पोहोचलण्यासाठी ते सज्ज झालेत. जयेशला छोट्या शाहीर साबळेंच्या आवाजातील गाणे गाण्यासाठी करारबद्ध केले आहे. हे गीत आजचे आघाडीचे गीतकार गुरू ठाकूर यांनी लिहिले आहे
युट्यूब वरून चंद्रा गाणे गाऊन नेवाशाजवळच्या एका छोट्या गावातील जयेशला अजय-अतुल यांनी त्यांच्या आगामी ‘ महाराष्ट्र शाहीर ‘ या चित्रपटात गायची संधी दिली आहे. जयेश शिर्डीजवळील राहुरीपासून ३० किमीवर असलेल्या एका गावात राहणारा गरीब घरातील मुलगा. त्याच्या खड्या आवाजातील ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ हे त्याने शाळेच्या गणवेशात गायलेले गाणे सध्या युटयूबवरून उभ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. हे गाणे जेव्हा संगीतकार अजय-अतुल यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी शाहीरांच्या लहानपणीचे गाणे जयेशकडून गाऊन घ्यायचे ठरवले. अजय-अतुल त्याला मुंबईत घेऊन आले आणि त्याच्याकडून २ दिवस सरावही करून घेण्यात आला.
या सिनेमाचे दिग्दर्शक आणि शाहीर साबळेंचे नातू केदार शिंदे सांगतात की, ‘हे गाणे त्याने बेफाम गायले आहे. अजय-अतुल यांनी त्याच्यावर मेहनत घेऊन त्याच्यातील गुणवत्तेला १०० टक्के वाव देत त्याच्याकडून हे गाणे गाऊन घेतले आहे. हे गाणे यशराज स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रित केले गेले आहे. या स्टुडिओची भव्यता पाहून हा मुलगा दिपून गेला होता. पण त्याने या गाण्याला जो न्याय दिला आहे, त्याला तोड नाही. अर्थात हे सर्व श्रेय अजय-अतुल यांचे आहे. ते शाहिरांच्या लहानपणीच्या गाण्यासाठी गायकाच्या शोधात असतानाच हा व्हायरल झालेला व्हिडिओ त्यांच्यासमोर आला आणि त्यांनी गुणवत्ता हेरत त्याला परीसस्पर्श केला.’
वडील करतात ऑर्केस्ट्रामध्ये काम
जयेश सर्वसामान्य घरातील सहावीत शिकणारा मुलगा आहे. त्याचे वडील एका ऑर्केस्ट्रामध्ये कि-बोर्ड वाजवतात. मात्र वर्षातील सहा महिनेच त्यांना याठिकाणी काम मिळते, इतर दिवस ते शेतमजुरी करून घरखर्च आणि जयेशच्या शिक्षणाचा खर्च भागवतात. जयेश चार वर्षाचा असतानाच त्याची ही प्रतिभा त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी त्याला प्रोत्साहन दिले. सिनेमातील गाण्यामुळे त्याला मोठी संधी मिळाली एवढं मात्र नक्की.