जामखेड न्युज——
खाद्यतेलाच्या तपासणीची अन्न व औषध प्रशासन विभागाची विशेष तपासणी मोहीम
खाद्यतेलाचा वारंवार वापर न करण्याचे अन्न व्यावसायिकांना आवाहन
एकदा वापरून झालेल्या खाद्यतेलाचा वारंवार वापर करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे व्यावसायिकांच्या खाद्यतेलाची तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तपासणीवेळी जर एखादया अन्न व्यावसायिकांच्या खाद्यतेलातील घातक पदार्थाचे (पोलर कंपाऊन्ड) प्रमाण टीपीसी मशिनद्वारे २५ टक्क्यांपेक्षा जास्त आढळून आले तर अशा व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात येईल. तेव्हा व्यावसायिकांनी खाद्यतेलाचा वारंवार पुर्नवापर करु नये. असे आवाहन अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सं. पां. शिंदे यांनी केले आहे.
उपाहारगृहे, फेरीवाले व इतर लहान-मोठे व्यावसायिक तयार अन्नपदार्थांची विक्री करतात. खाद्यतेलाच्या वारंवार पुर्नवापरामुळे त्यामधील पोषक मुल्य कमी होवून घातक पदार्थांचे प्रमाण वाढते. या पदार्थामुळे घशाचे आजार, कोलेस्टेरॉल वाढणे यासारख्या गंभीर परिणामाला सामोरे जावे लागते.
संपूर्ण भारतात ५ ऑगस्ट २०११ पासून अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ या एकच अन्नविषयक कायदयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्याच्या जनजागृतीसाठी वेळोवेळी जिल्हास्तरावर शिबिर / कार्यशाळा, वृत्तपत्र प्रकाशन, प्रशातफेरी, व्यसनमुक्ती शपथ, कमी तेल-कमी मीठ कमी साखर याबाबत जनजागृती, व्हिडीओ-रेडिओ टॉक तसेच पोस्टर्स या माध्यमांचा वापर केला जातो. परवानाधारक व नोंदणीधारक आस्थापनांनी, अन्न व्यावसायिकांनी (अन्न उत्पादक, वितरक, घाउक, किरकोळ विक्रेते, हॉटेल व्यावसायिक इत्यादी) विक्री बिलावर एफएसएसएआय अंतर्गत घेतलेला परवाना/नोंदणी प्रमाणपत्र याचा क्रमांक नमूद करणे कायदयाने बंधनकारक आहे.
यापूर्वी परवाना/नोंदणी घेतले आहेत. अशा व्यावसायिकांनी अर्जामध्ये स्वतःचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी दिला नसेल तर, अथवा काही सल्लागार (ऑनलाईन सुविधा देणारे व्यक्ती) यांचेकडून अर्ज करतानाचा युजर आयडी व पासवर्ड अन्न व्यावसायिकांनी स्वत:चा दिला नसेल तर अशा व्यावसायिकांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधून स्वतःचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्यावत करुन घ्यावेत. यापुढे सर्व अन्न आस्थापनेच्या तपासण्या या ऑनलाईन प्रणालीव्दारे केल्या जाणार असून फसवणूक व इतर गैरप्रकार टाळणेसाठी हे आवश्यक आहे. असे आवाहनही श्री.शिंदे यांनी केले आहे.