तालुकास्तरावर जातपडताळणी प्रमाणपत्र वाटप शिबीरे घेणार – समिती अध्यक्ष विकास पानसरे

0
198

 

जामखेड न्युज——

तालुकास्तरावर जातपडताळणी प्रमाणपत्र वाटप शिबीरे घेणार – समिती अध्यक्ष विकास पानसरे

कोपरगाव येथे जातपडताळणी कार्यशाळा संपन्न

 

जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना अहमदनगर येथे येऊन अर्ज करण्याचा त्रास होऊ नये यासाठी तालुकास्तरावर प्रमाणपत्र अर्ज स्विकृती व वाटप शिबीरे घेण्यात येतील. यातून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. अशी माहिती अहमदनगर जिल्हा जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) विकास मारूती पानसरे यांनी आज येथे दिली.

शासनाच्या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने कोपरगांव येथील के.बी.रोहमारे (कनिष्ठ) व के.जे.सोमैय्या (वरिष्ठ) महाविद्यालयात जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या ऑनलाईन प्रक्रियेविषयी प्राचार्य व कर्मचाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना श्री.पानसरे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ.बी.एस.यादव, जात पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी भागवत खरे, माहिती अधिकारी सुरेश पाटील, उपप्राचार्य बी.आर.सोनवणे आदी उपस्थित होते.

श्री.पानसरे म्हणाले, चुकीच्या माणसाला लाभ न दिला जाता योग्य लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मंजूर झाला पाहिजे. यासाठी जात वैधता प्रमाणपत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष लाभार्थी विद्यार्थ्यांस प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या काळात प्रमाणपत्र वाटपाचे मेळावे घेतले जातील. तालुका स्तरावर कॅम्प घेतले जातील. यातून जात पडताळणीच्या कामात गतिमानता व पारदर्शकता येणार आहे. असे ही श्री. पानसरे यांनी यावेळी सांगितले.

श्री.खरे म्हणाले, जातपडताळणीची प्रक्रिया साधी व सरळ आहे. लोकांनी गैरसमजातून ती किचकट करून ठेवली आहे. मध्यस्थांच्या मागे न जाता योग्य मार्गाने व वैध पुराव्यानिशी ऑनलाईन अर्ज केल्यास अर्जदारास कुठेही न जाता घर बसल्या प्रमाणपत्र दिले जाते. यावेळी उपस्थित कर्मचारीच्या शंकांचं समाधान ही श्री.खरे यांनी केले.

जातपडताळणी चा प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये जाऊन जात प्रमाणपत्रांविषयी शंकांचे समाधान करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.रोहमारे यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी समितीचे संस्थेचे कुलसचिव डॉ.अभिजित नाईकवाडे, लिपिक अजय सुलाणे, उपप्राचार्य नारायण बारे, डॉ.जे.एस.मोरे यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here