जामखेड न्युज——
वयोवृद्ध आजी -आजोबांना ‘ स्नेहसावली ‘ च्या माध्यमातून मिळतोय ‘ परिवार ‘
“निलेश मोहिते बनलेत वृध्दांचा आधार, अनेकांना मिळालाय स्नेहसावलीत आधार”
काबाडकष्ट करून आपल्या मुलांना लहानाचे मोठे केल्यानंतर अनेकजण आई वडिलांना विसरतात.म्हातारपणी त्यांच्या आधाराची काठी बनण्याऐवजी त्यांना घराबाहेर हाकलून दिले जाते.अनेक वयोवृद्ध आजही त्यांचे लेक गडगंज पैशावाले असतानाही भिक मागून खातात.फूटपाथवर झोपतात.अशा वयोवृद्ध निराधारांसाठी रामनगर येथील स्नेहसावली फाऊंडेशन संचलित सावली मुक्त वृध्दाश्रम सुरू करण्यात आला आहे.या वृध्दाश्रमात अनेक वृद्ध आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वी मरणयातना भोगणार्या एका आजीला स्नेहसावली परिवाराने आणले.
त्या आजी ठणठणीत झाल्या असून त्यांना स्नेहसावलीच्या माध्यमातून आपला परिवार मिळाल्याने समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले. हे पुण्याचे काम निलेश मोहिते आणि त्यांच्या पत्नी सौ वैष्णवी मोहिते या करत आहेत.
स्नेहसावली फाऊंडेशन संचलित सावली मुक्त वृध्दाश्रम सुरू करण्यात आलेले आहे. गणपती बप्पाच्या आगमनाबरोबरच येथे दगडू भागूजी गवते पाटील आणि आशाबाई दगडु गवते पाटील या दांपत्याचे आगमन झाले.त्यांचे स्नेहसावली परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले.आशाबाई या मुक्या आणि आंधळ्या आहेत.त्यांना एकुलता एक मुलगा होता,तो मरण पावला.तीन एकर रोडटच असलेली जमीन सुनाच्या नावची करून दिल्याने त्यांना कुणाचाही आधार नव्हता त्यांना नातलगांचा आधार नसल्याने ते आयुष्याचे शेवटचे दिवस कसे बसे घालत होते.याचवेळी ते स्नेहसावली परिवाराच्या संपर्कात आल्याने तेथे आनंदाने विसावले आहेत. तर एका आजीला तिला रस्त्यावर फेकले होते.ती मरणयातना भोगत असताना स्नेहसावली परिवाराने तिला आपल्या सावली मुक्त वृध्दाश्रम मध्ये आणले. आज ती आनंदाने जीवन जगत आहे. स्नेहसावलीतील चिमुकल्यांना आजी आजोबा आणि आजी आजोबांना नातु मिळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान उमटत आहे.
आम्ही स्नेहसावली फाऊंडेशन संचलित सावली मुक्त वृध्दाश्रम सुरू केले आहे.आमच्याकडे वृद्ध कधीही येवू शकतात , त्यांना जोपर्यंत हवे तोपर्यंत येथे बिनधास्त राहु शकतात .त्यानंतर त्यांना आपल्या घरी जायचे असले तरी ही जावू शकतात. आम्ही त्या साठी मुक्त असे वृध्दाश्रम सुरू केले आहे.या वृध्दाश्रमाच्या माध्यमातून अनेक वयोवृद्धांना आम्ही आधार देण्याचे काम करत आहोत.
निलेश मोहिते संचालक, स्नेहसावली फाऊंडेशन संचलित
स्नेहसावली बालघर, सावली मुक्त वृध्दाश्रम