Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या आमदार रोहित पवारांच्या नियोजनामुळे कर्जत-जामखेड तालुक्यात मनरेगा अंतर्गत जिल्ह्यात सर्वाधिक रोजगार ...

आमदार रोहित पवारांच्या नियोजनामुळे कर्जत-जामखेड तालुक्यात मनरेगा अंतर्गत जिल्ह्यात सर्वाधिक रोजगार २१ कोटी रुपये खर्च, ५ हजाराहून अधिक कामे पूर्ण

0
263

 

जामखेड न्युज——

आमदार रोहित पवारांच्या नियोजनामुळे कर्जत-जामखेड तालुक्यात मनरेगा अंतर्गत जिल्ह्यात सर्वाधिक रोजगार

२१ कोटी रुपये खर्च, ५ हजाराहून अधिक कामे पूर्ण

‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’अंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देण्यात जिल्ह्यात जामखेड आणि कर्जत हे दोन तालुके अनुक्रमे प्रथम व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दोन्ही तालुक्यात मिळून सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाची अशी २१ कोटी रुपयांची ५ हजाराहून अधिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील लोकांसाठी मोठा आधार ठरत आहे. शिवाय यातून सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वरुपाची कित्येक कामे पूर्ण करता येतात, हे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत-जामखेड या मतदारसंघात दाखवून दिले आहे.

प्रत्येक सरकारी योजनेचा कर्जत-जामखेड मतदारसंघातील अधिकाधिक लोकांसाठी पुरेपूर उपयोग व्हावा, यासाठी आमदार रोहित पवार यांचे नेहमीच प्रयत्नशील असतात. ‘रोहयो’च्या माध्यमातूनही जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी कर्जत-जामखेड या दोन्ही तालुक्यात अनेक कार्यशाळा घेतल्या. यामध्ये अधिकारी, पदाधिकारी, रोजगार सेवक, समन्वयक या सर्वांच्या समन्वयाने रोजगार हमी योजनेअंतर्गत करायच्या विविध कामांचे नियोजन करण्यात आले. आमदार रोहित पवार यांचे वैयक्तिक लक्ष आणि प्रांताधिकारी, दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार, दोन्ही तालुक्यांचे बीडीओ, कृषी अधिकारी आणि त्या-त्या विभागांचे सर्व कर्मचारी यांच्या नियोजनामुळे कर्जत-जामखेड हे दोन्ही तालुके ‘रोहयो’ अंतर्गत केलेल्या कामांमध्ये जिल्ह्यात आघाडीवर आहेत.

शिवाय नागरिकाने रोजगाराची मागणी केल्यानंतर त्याला तत्काळ रोजगारही उपलब्ध करुन दिला जातो आणि शिवाय पंधरा दिवसात पैसेही अदा केले जातात. विशेष म्हणजे जिल्ह्यात केवळ जामखेड तालुक्यात पंधरा दिवसात मजुरांना कामाचे पैसे दिले जातात तर कर्जत तालुक्यातही असाच प्रयत्न सुरु आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शाळेला संरक्षक भिंत बांधणे, गायगोठा, शेळी पालनाचे शेड, कुक्कुटपालनाचे शेड, फळबाग, शेततळे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड, विहीरी, शोषखड्डे, घरकूल ही जामखेड तालुक्यात १०.८५ कोटी रुपयांची तर कर्जत तालुक्यात ९.९५ कोटी रुपयांची कामे करण्यात आली.

अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीत पेव्हिंग ब्लॉक टाकण्यात आले आणि रस्तेही करण्यात आले असून आता ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीही बांधण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे रोहित पवार आमदार होण्यापूर्वी खर्चाच्या बाबतीत नाशिक विभागातील ५४ तालुक्यात खालून ५ वा क्रमांक असणारा जामखेड तालुका आता वरुन ५ व्या क्रमांकावर तर कर्जत तालुका ७ व्या क्रमांकावर आहे. ‘रोहयो’ अंतर्गत करायच्या कामांमध्ये समन्वय राखण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यात प्रत्येकी एक अशा दोन समन्वयकांची नेमणूक करुन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अधिकाधिक लोकांना काम देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अशा प्रकारे समन्वयक नेमणे आणि कार्यशाळा घेणे या दोन्ही गोष्टी केवळ कर्जत-जामखेड या दोन तालुक्यातच होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळेच कर्जत-जामखेड हे दोन्ही तालुके रोहयोअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये आघाडीवर असल्याचे दिसते.
———- … ..

*प्रतिक्रिया*

‘‘रोहयो च्या माध्यमातून मागेल त्याला रोजगार उपलब्ध करुन देण्याचा आणि अधिकाधिक सार्वजनिक व वैयक्तिक लाभाची कामे करण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रशासनाकडून त्यासाठी मोठे सहकार्य मिळत असल्यामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे करता आली. भविष्यातही प्रत्येक योजनेचा मतदारसंघातील अधिकाधिक लोकांना फायदा व्हावा, यासाठी प्रयत्न सुरुच राहतील.’’
– रोहित पवार
आमदार, कर्जत-जामखेड

चौकट
पूर्ण झालेली कामे

शाळेला संरक्षक भिंत बांधणे – ३५, गायगोठा – ११७५, शेळीपालन शेड – ६०, कुक्कुटपालन शेड – २४, फळबाग – २१८०, शेततळे – ५०, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड – ६१, विहिरी – १३०, शोषखड्डे – १५००, एकूण कामे – ५११२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!