जामखेड प्रतिनिधी –
जामखेड न्युज——
विकासापासून कोसो दूर असलेल्या भटक्या विमुक्त समाजातील निराधार, अनाथ, वंचित घटकांतील मुला – मुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांचे आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबन यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या ग्रामीण विकास केंद्राचे कार्य हे समाजाला प्रेरणा देण्याचे काम करीत आहे. असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामीण विकास केंद्र संचालित, निवारा बालगृह, समता भूमी आयोजित रिट्टेनमेअर इंडिया प्रा. लि. ठाणे या कंपनीच्या अर्थसाहाय्यातून उभारण्यात आलेल्या ग्रंथालय, अभ्यासिका, स्टोअर रूम, प्रोजेक्टर हॉल व सोलर वॉटर हिटर च्या विद्यार्थी अर्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
मोहा गावच्या सरपंच सौ. सारिका ताई डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास रिट्टेनमेअर कंपनीचे जनरल मॅनेजर संजीव चव्हाण, लॉजिस्टिक्स मॅनेजर सुभाष कोकणे, जामखेड चे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोलीस निरीक्षक थोरात, शिवनेरी अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे, प्रा. डॉ. रंगनाथ सुपेकर, सिने अभिनेता राजेश नन्नवरे, सचिन चव्हाण, रिलस्टार कोंडीराम वाघमोडे, ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक ॲड. डॉ. अरुण जाधव, सचिव सौ. उमा ताई जाधव, अलका ताई जाधव, संचालक बापू ओहोळ आदी यावेळी विचारपिठावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डी. वाय. एस. पी. अण्णासाहेब जाधव म्हणाले की, आपण सध्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करीत आहोत. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाले तरी भटक्या विमुक्त समाजाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण विकास केंद्र ही संस्था त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपड करीत आहे. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. आम्ही देखील या उपक्रमाना आमच्या परीने शक्य तेवढी साथ देण्याचे प्रयत्न करू.
रिट्टेनमेअर कंपनीचे जनरल मॅनेजर संजीव चव्हाण म्हणाले की, आमच्या कंपनीने ग्रामीण विकास केंद्र या संस्थेला दिलेल्या मदतीचा अत्यंत चांगल्या कामासाठी उपयोग होत आहे हे पाहून समाधान वाटले. संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमात कंपनी सहभागी होईल. आणि शक्य तेवढी मदत करील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्याच बरोबर संस्थेस ३ लाख रुपये मदतीचा धनादेश ॲड. अरुण जाधव यांच्याकडे सुपूर्त केला.
यावेळी सुभाष कोकणे, कॅप्टन लक्ष्मण भोरे, ॲड. अरुण जाधव, सिने अभिनेता राजेश नन्नवरे, सचिन चव्हाण, रील स्टार कोंडीराम वाघमोडे, सरपंच सारिका ताई डोंगरे यांचीही भाषणे झाली. उमा ताई जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बापू ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. भगवान राऊत व संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. वैजीनाथ केसकर यांनी आभार मानले.
प्रारंभी पाहुण्यांचे आगमन होताच निवारा बाळगृहाच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात उस्फूर्तपणे स्वागत केले. संगीता केसकर, गीता माळी, शितल केसकर यांनी पाहुण्यांचे औक्षण केले. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून ग्रंथालय, अभ्यासिका,स्टोअर रूम व सोलर वॉटर हीटर प्रकल्पाचे उद्घाटन व विद्यार्थी अर्पण करण्यात आले. लावण्या जाधव आणि सहकाऱ्यांनी देश रंगीला या गीतावर बहारदार नृत्य सादर केले. निवारा बाल गृहातील विद्यार्थ्यांनी विविध देश भक्तिपर गीतावर नृत्य सादर केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वैजीनाथ केसकर, संगीता केसकर, सचिन भिंगारदिवे, द्वारका ताई पवार, विशाल पवार, अनिल लष्कर, आतिश पारवे, अजिनाथ शिंदे, काजोरी पवार, अतुल ढोणे, राजू शिंदे, संतोष चव्हाण, छाया मोरे, ऋषिकेश गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.