विधानपरिषदेतही भाजपचाच सभापती होणार? प्रा. राम शिंदे यांचे नाव आघाडीवर

0
225
जामखेड न्युज——
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडत भाजपने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या मदतीने राज्याची सत्ता काबीज केली. मुख्यमंत्रिपद जरी एकनाथ शिंदे यांच्याकडे असले तरी विधानसभा अध्यक्षपदासह मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवत भाजपने सरकारमधील आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. या घडामोडींमुळे आधीच बॅकफूटवर गेलेल्या महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देण्यासाठी भाजप नेतृत्वाकडून व्यूहरचना आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री पदची व
 नंतर प्रदेशाध्यक्ष पदाची संधी चुकलेल्या आमदार राम शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. 
विधानसभेनंतर विधानपरिषदेतही निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या सभागृहाच्या सभापती पदावर आपल्या पक्षाचा नेता बसावा, यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. सभागृहाच्या कामकाजावरील पकड घट्ट करण्यासाठी सभापतीपद मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. या पदासाठी विधानपरिषद आमदार राम शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. खरंतर राम शिंदे यांचे नाव भाजपच्या प्रदेशाध्यपदासाठीही चर्चेत होते. मात्र पक्षनेतृत्वाने या पदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विश्वास टाकला. त्यामुळे आता सभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी देऊन भाजपकडून राम शिंदे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
विधानपरिषदेत आकड्यांचं गणित कसं आहे?
विधानपरिषदेत एकूण ७८ सदस्य असतात. सद्यस्थितीत या सभागृहात भाजपकडे २४, तर शिवसेनेकडे ११ आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी १० जागा आहेत. तसंच १६ जागा रिक्त आहेत. यामध्ये राज्यपाल नियुक्त १२ जागांचाही समावेश आहे. राज्यात भाजप-शिंदे गटाची सत्ता असल्याने या १२ जागांवर मंत्रिमंडळाने सुचवलेल्या नावांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून लवकरच शिक्कामोर्तब केलं जाईल.
त्यामुळे भाजपचं संख्याबळ वाढून ३६ वर पोहोचणार आहे. तसंच रासपचा एक आणि एका अपक्ष आमदाराच्या जोरदावर भाजपची एकूण संख्या ३८ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र आले तरी त्यांची संख्या ३१ इतकीच होते. शेकाप आणि अन्य काही पक्षांनी महाविकास आघाडीला साथ दिली तरी त्यांच्याकडे जास्तीत जास्त ३६ इतके आमदार होऊ शकतात. त्यामुळे सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपचं पारडं जड असणार आहे.
या पार्श्वभूमीवर विधानपरिषद सभापतीपदाची निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता असून आगामी काळात नेमकी काय समीकरणे जुळवली जातात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here