जामखेड न्युज——

तालुक्यातील साकत ग्रामपंचायत अंतर्गत पिंपळवाडी आहे या ठिकाणी लेंडी नदीवर पूल आहे पण तो तुटलेला आहे या पुलावरून विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. तसेच गावात स्मशानभूमी नाही त्यामुळे ताबडतोब पक्का पुल करावा व स्मशानभूमी करावी म्हणून आमदार रोहित पवारांना युक्रांदच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.

कोल्हेवाडी तसेच पिंपळवाडी येथील लोकांना साकत व जामखेडला ये -जा करण्यासाठी हा रस्ता आहे. तसेच विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी बसही आहे पुल मोठ्या प्रमाणावर खचला असून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे यामुळे ताबडतोब पक्का पुल बांधावा असे निवेदन देण्यात आले आहे.

मागल्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये पिंपळवाडी येथील मुख्य पूल अर्ध्या भागातून खचला. त्यामुळे वाहतूक करणाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. सध्याच्या पावसाळ्यामध्ये मोठा पाऊस झाला तर तो पूल कोणत्याही वेळी वाहून जाऊ शकतो. परिणामी पिंपळवाडी गावचा जामखेड शहर आणि इतर सर्व गावांशी असलेला संपर्क तुटणार आहे. तसेच पुलाच्या पलीकडे गावाचे अर्धे शिवार असल्याने, शेतकऱ्यांचीही गैरसोय होणार आहे.

तसेच गावात अजून स्मशानभूमी नसल्यामुळे मृत व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी अडचण होत आहे. लोकांना अक्षरश: पत्र्याचा तात्पुरता निवारा करून अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

पक्क्या पुलाची उभारणी आणि स्मशानभूमीची मागणी आज युक्रांदच्या कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांना त्यांच्या जामखेड येथील कार्यालयात निवेदनाद्वारे केली. यावेळी युक्रांदचे जामखेड तालुका प्रमुख विशाल नेमाने, उपाध्यक्ष विजय घोलप, निलेश नेमाने, अजय नेमाने, अशोक नेमाने, प्रताप घोलप इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



