जामखेड न्युज—–
भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण अनेक क्षेत्रात उतुंग भरारी घेतली आहे पण आजही पोटाचे खळगे भरण्यासाठी वणवण भटकणारे चिमुकले दिसतात आणी मन हेलावून जाते. जामखेड नागपंचमी निमित्ताने आनंदनगरी मेळा भरतो या मेळ्यात अनेक व्यावसायिक लोक येतात या लोकांची लहान लहान मुले बालवयात आई वडिलांना मदत करत त्यांच्या बरोबर भटकंती सुरू असते शिक्षण नाही अशीच एक चिमुकली फुगे विकत असताना दिसली. जवळ खारमुरेचा गाडा होता लोक खारमुरे घेत खारमुरे कागदाचे गोल नळकांडे करून त्यात देत होते लोक यातील खारमुरे खात शेवटी काही खारमुरे त्यात शिल्लक राहत लोक ते नळकांडे फेकून देत आणी ती चिमुकली ते गोळा करून त्यातील एकदोन खारमुरे गोळा करून खात होती हे पाहून मन हेलावून गेले.

स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली तरीही अण्णाच्या शोधात अनेक चिमुकले जीव वृद्ध माणसे भटकताना दिसतात हे खरोखर मोठे दुर्दैव आहे. अनेक चिमुकले जीवही भटकत आहेत सर्व शिक्षा अभियानात ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण अभियान आहे पण भटकंती करणारे लोक त्यांची मुले आजही शिक्षणापासून वंचित आहेत. हे मोठे दुर्दैव आहे.

हे मन हेलावून टाकणारे चित्र बाहेर दिसले. विचारचक्र तिथेच थांबलं मन सुन्न झाले अन् डोळे पाणावले. पोटाची खळगी भरवण्यासाठी एक चिमुकली लोकांनी टाकून दिलेल्या कागदाच्या नळकांड्यातील खारमुरे शोधत होती. अन्न शोधत होते. असे कितीतरी लोक पोटाची खळगे भरण्यासाठी भटकताना दिसतात. कोणी कचराकुंडीत अन्न शोधत असते तर कोणी रस्त्यावर पडलेले अन्न उचलून पोटाचे खळगे भरताना दिसत असते.

असे किती लोक असतील जे किमान एक वेळचं खायला मिळावं म्हणून जीवाचा आटापिटा करत असतील? अनेक उपाय शोधत असतील? किंवा किती लोक काहीच नाही मिळाले म्हणून पोटाजवळ घुडघे घेऊन रात्रभर स्वतःची समजूत घालत असतील? एवढ्या मोठ्या भारत देशात ही उपासमारीची भयावह परिस्थिती निर्माण व्हावी, यासारखे दुर्दैव दुसरे कोणते असेल! जागतिक स्तरावर सर्वाधिक उपासमारी असणाऱ्या देशांपैकी एक असणारा आपला ‘महान’ देश.

अनेक हॉटेलांमध्ये रोज कितीतरी उरलेले फेकून देतात. ताटात अन्न शिल्लक राहतं तेही फेकून दिले जाते. एकीकडे एखादा तरी अन्नाचा कण पोटात जावा म्हणून धडपडणारे जीव आणि दुसरीकडे ही अन्नाची नासाडी. हे हॉटेलांमध्ये उरलेले अन्न या भुकेल्यांपर्यंत कसे पोहचवता येईल?

आपल्या कामातून रोज थोडा वेळ काढता येईल का? आपणच हे सुरु केले तर? पण कुठून सुरु करू? माझ्या प्रयत्नांना यश मिळेल का? असे एक नाही अनेक प्रश्न फिरत होती. पण, विषय खरंच खूप गंभीर आहे. सर्वांनी यावर विचार करणे गरजेचे आहे. कमीत कमी आपण अन्नाची नासाडी होणार नाही याची काळजी तर घेऊ शकतो. भुक असेल तेवढेच अन्न ताटात घ्यावं. उरलेल अन्न फेकून देण्यापेक्षा भुकेलेल्या अन्न द्यावे. खुप काही नाही पण एवढं केल तरी किती मोलाची मदत होईल.