अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार ठरला!!!

0
206
जामखेड न्युज——
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तूर्तास मंत्रिमंडळाचा विस्तार छोटेखानी स्वरूपात करण्याचा ठरविले आहे. त्यासंदर्भात या दोघांनी दिल्लीत भाजपश्रेष्ठींशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत ५ ते ७ किंवा जास्तीत जास्त १० आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची भूमिका शिंदे-फडणवीस यांच्यासह भाजपश्रेष्ठींनी घेतल्याची माहिती आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विरोधी पक्षांकडून शिंदे-फडणवीस यांना याच कारणावरून टीकेचे धनी व्हावे लागत आहे. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलेल्या टीकेनंतर घूमजाव करण्यात आले. तसेच, राज्याच्या काही भागात होत असलेली अतिवृष्टी पाहता पालकमंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज असताना पालकमंत्री नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे शिंदे-फडणवीस यांनी ठरविले असले तरी तो छोटेखानी म्हणजेच ५ ते ७ किंवा जास्तीत जास्त १० आमदारांनाच मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे. हा विस्तारही येत्या पंधरा ऑगस्टपूर्वी होण्याची शक्यता वर्तविण्यात येणार आहे. बंडखोर १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, यासंदर्भातील सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यामध्ये खुद्द एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे. तसेच, निवडणूक आयोगाकडेही शिवसेना कोणाची, निवडणूक चिन्हाबाबत वाद दाखल करण्यात आलेला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी केलेली वक्तव्ये पाहता धोका टाळण्यासाठी हा छोटेखानी विस्तार होण्याचे संकेत मिळत आहेत. यामध्ये गृहखाते हे भाजपकडे राहील, हे देवेंद्र फडणवीसांच्या कालच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाला कोणती खाती मिळतात, हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here