जामखेड न्युज——
नागेश्वराच्या पावन भूमीत कै.विष्णू उस्ताद काशीद उर्फ बाबा यांच्या स्मरणार्थ भव्य जंगी निकाली कुस्त्यांचे मैदान गेल्या 19 वर्षापासून जामखेड शहरांमध्ये मोठ्या दिमाखात साजरे होत आले आहे.
याही वर्षी कै.विष्णू (उस्ताद) काशीद उर्फ बाबा यांच्या स्मरणार्थ सालाबादप्रमाणे भव्य जंगी निकाली कुस्त्यांचे मैदान मराठी शाळेच्या बाजूला भव्य दिव्य अशा स्वरूपात दिनांक 3 ऑगस्ट 2022 वार बुधवार रोजी दुपारी 2 ते 7 या वेळेत साजरे होणार आहे. तरी या भव्य जंगी निकाली कुस्त्यांसाठी तालुक्यातील,राज्यातील, नव्हे तर राज्य बाहेरील पैलवान हजेरी लावतात. याही वर्षी पैलवानांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कुस्त्यांचा सोहळा भव्य दिव्य असा साजरा करावा. असे आवाहन कै. विष्णू (उस्ताद) काशीद प्रतिष्ठानचे मुख्य संयोजक तथा भाजपाचे तालुका अध्यक्ष मा.अजय (दादा )काशीद यांनी केले आहे.
या भव्य जंगी निकाली कुस्त्यांच्या मैदानासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष मा.मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब असतील.तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.खा.डॉ. सुजय विखे पाटील,आ.सुरेश (आण्णा) धस,आ.रोहित (दादा) पवार,आ.बाळासाहेब (काका) आजबे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष मा. अरुण (भाऊ) मुंडे, इंदोर मध्य प्रदेश येथील भाजपाचे नेते मा.अशोकजी खंडेलवाल,हिंद केसरी मा.रोहितजी पटेल,ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान मा.विजय चौधरी(DYSP), राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुवर्णपदक तथा अर्जुन पुरस्कार विजेता मा.राहुल आवारे (DYSP)हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावर्षीच्या कुस्ती मैदानाचे वैशिष्ट्य म्हणजे या वेळेची अंतिम कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. बाला रफिक शेख व उपमहाराष्ट्र केसरी पै.अक्षय शिंदे यांच्यात होणार असून इतर कुस्त्या सुद्धा महाराष्ट्रातील प्रसिद्ध आखाड्यातील नामांकित पैलवानांच्या होणार आहेत.तरी कुस्ती शौकिनांसाठी ही पर्वणी असून याचा लाभ घ्यावा.असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात येत आहे.
या कुस्ती मैदानाचे हे 20 वे वर्ष असून ,तितक्याच आनंदामध्ये या मैदानाच्या आयोजन श्री.अजय (दादा )काशीद मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी केले जाते. या वर्षी मित्र मंडळाच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान तसेच तालुक्यातील शालेय खेळाडू विद्यार्थ्यांचा सुद्धा स्पोर्ट टी शर्ट देवून सन्मान मंडळाच्या वतीने आयोजित केला आहे.
मा.उपमहाराष्ट्र केसरी मा. बबन (काका)काशीद आणि मराठा भाषिक महासंघाचे अध्यक्ष मराठा गौरव मा. युवराज (भाऊ) काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती मैदानाची संयोजन टीम काम करत असून,या भव्य जंगी निकाली कुस्त्यांच्या मैदानासाठी पंचक्रोशीतील नव्हे तर जिल्ह्यातील सर्व पहिलवानांनी व कुस्ती शौकिनानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मैदानाचे संयोजक मा. अजय (दादा) काशिद मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.