जामखेड न्युज——
कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा पवार यांच्या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 20 जुलै ते 26 जुलै दरम्यान मोफत जनरल आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला कर्जत जामखेडमधील शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यात आपला सहभाग नोंदवला. या शिबिरादरम्यान तब्बल 20 हजार रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देखील देण्यात आली आहेत.

कर्जत-जामखेड मतदारसंघात आयोजित सात दिवसीय आरोग्य शिबिराला पुण्यातील नामांकित डी.वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, भारतीय संस्कृती महाविद्यालय यांचे सहकार्य लाभले तसेच येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये तसेच वाड्या वस्त्यांवर जाऊन अगदी आपुलकीने डॉक्टरांनी रुग्णांच्या तपासण्या केल्या. दोन्ही तालुक्यातील एकूण 228 गाव व वाड्या वस्त्यांवर जाऊन हे शिबिर राबवले गेले. विशेष म्हणजे ज्या रुग्णांना शिबिराच्या ठिकाणी पोचता येत नसेल अशा ठिकाणी स्वतः डॉक्टरांची तुकडी पोचून त्यांनी संबंधित रुग्णांची प्राथमिक तपासणी केली.

या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणीसह अँजियोओप्लास्टी, अँजिओग्राफी तसेच बायपास यासारख्या सर्जरीसाठी चेकअप करून नाव नोंदणी करून घेण्यात आली. तसेच तिरळेपणा, मोतीबिंदू यांसारखे आजार व वंध्यत्व, महिलांचे आजार, ओठ फाटणे तसेच दुभंगलेले ओठ या समस्या असलेल्या नागरिकांच्याही नोंदणी करून घेण्यात आल्या. त्यांच्यासाठी लवकरच सुपर स्पेशालिटी कॅम्पचे आयोजन करून त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार आहेत. याशिवाय अपंगत्वाचा दाखल मिळवण्यासाठीची देखील नाव नोंदणी या शिबिरांतर्गत करण्यात आली आहे. या द्वारे मतदारसंघातील नागरिकांना आपल्या गावातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करून त्यावर औषधे देखील घेता आली. अशाच प्रकारचे शिबिर डिसेंबर 2021 मध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत जामखेड तालुक्यात आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये 24 हजारांहून अधिक नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला होता.

अशा प्रकारची शिबिरे आयोजित करून नागरिकांना विविध स्तरावर मदत करण्याचा प्रयत्न आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून नेहमीच होत असताना पाहायला मिळतो.