श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीवर यश

0
219
जामखेड प्रतिनिधी 
   जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
      मराठी विज्ञान परिषद,मुंबई आणि गांधी रिसर्च फाउंडेशन,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या  जामखेड तालुक्यातील  जवळा येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर तिसरा क्रमांक मिळवुन घवघवीत यश मिळवले आहे.
      श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील  इयत्ता पाचवी ते सातवी या गटातील इयत्ता सहावीतील सुफीयान जाकिर शेख ,अर्थव बापू खाडे आणि साई संतराम सूळ  या विद्यार्थ्यांनी गणित विषयाचे अंकांचे कोडे हे मॉडेल तयार करुन ऑनलाइन सादरीकरण केले. या मॉडेलचा भारतातून तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.
       संपूर्ण भारतातून इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी  अशा दोन गटातून १ हजार ९५० विद्यार्थ्यानी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अभिनंदन कार्यक्रमाचे अध्यक्ष  जेष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी केले आहे. या विद्यार्थ्याना पेटेंट मिळवून देण्यासाठी मदत करणार असल्याचे नॅशनल इनोवेशनचे डॉ.विपिन कुमार यांनी यावेळी घोषित केले आहे.
       या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारोह  राष्ट्रीय विज्ञान दिनी (२८ फेब्रुवारी)  ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ अणुशास्त्रज्ञ व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे चेअरमण डाॅ.अनिल काकोडकर होते.तसेच नॅशनल इनोवेशनचे डॉ.विपिन कुमार,गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.सुदर्शन आयंगर,जेष्ठ अनुशास्त्रज्ञ प्रो.जे.बी.जोशी,मराठी विज्ञान परिषेदेचे मानद सचिव ए.पी.देशपांडे,गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सौ.अंबिका जैन उपस्थित होत्या.
     यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक  एस.एल.शिंदे, व्ही.ई.ओव्हाळ,शिक्षिका श्रीम.एस.ए.पाचपुते यांनी मार्गदर्शन केले .
      या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी  तुकाराम कण्हेरकर ,सहाय्यक  विभागीय अधिकारी काकासाहेब वाळूंजकर ,  शिवाजीराव तापकीर , विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस.आर.उगले, मुख्याध्यापक ए.एस.गरड,स्थानिक स्कूल कमिटीचे पदाधिकारी , जवळयाचे सरपंच व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.
चौकट –
        महात्मा गांधी यांच्या विचारांना अभिप्रेत ग्राम स्वराज्य निर्माण करण्यासाठी विज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध प्रयोग करून उपयोगी शाश्वत व पर्यावरणपूरक तंत्रज्ञान निर्माण व्हावे,म्हणून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांच्यातील कल्पनाशक्तीला वावं देऊन त्यांच्यातून भविष्यात चांगले संशोधक,शास्त्रज्ञ निर्माण करण्याच्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here