जामखेड न्युज——
राज्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असल्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारकडून तातडीने स्थगित करण्यात आल्या आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीचाही समावेश आहे. ही निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली असली, तरी मंडळांसह उमेदवारांकडून मात्र प्रचार सुरू आहे.

निवडणूक स्थगित झाल्याने पुन्हा निवडणूक कधी होणार तीन महिन्यांच्या आत झाली तर ज्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तेच उमेदवार राहणार जर तीन महिन्यात पेक्षा जास्त काळ निवडणूक पुढे गेली तर कदाचित परत नव्याने प्रक्रिया सुरू होऊ शकते असे सर्वच प्रश्न अनुत्तरित आहेत.

एकतर उमेदवारी वरून प्रत्येक मंडळात मोठ्या प्रमाणावर नाराजीनाट्य सुरू आहे. अनेक जण तर विरोधी उमेदवाराचा प्रचार करणार म्हणून सांगत होते. काहींनी तर उमेदवारी नाकारल्याने राजीनामा दिलेला होता. निवडणूक जाहीर झाली तेव्हा प्रचाराला खुपच वेळ कमी आहे असे सांगितले जात होते. आता मात्र वेळच वेळ आहे त्यामुळे या संधीचा फायदा प्रत्येक मंडळ व उमेदवार घेत आहेत.
पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक प्रक्रिया स्थिर झाली आहे. निवडणूक स्थगित झाल्याने काहींना फायदा तर काहींना तोटा होणार आहे. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक मंडळाने प्रचार सुरू ठेवला आहे.
शाळा सुटल्यानंतर तर काहींचा शाळेच्या वेळेत प्रचार सुरू आहे. सध्या मतदारांच्या गाठीभेटी नेते व उमेदवारांकडून सुरू आहेत. समाजमाध्यमावरील प्रचार सध्या गुरुजींकडून वेगाने सुरू आहे. शिक्षण परिषदेत प्रचाराला बंदी असतानाही अनेक मंडळांनी शिक्षण परिषद हि सुवर्ण संधी समजून शिक्षण विभागाने नियम धाब्यावर बसवून शिक्षण परिषदेत आपापल्या मंडळाचे ध्येय धोरणे शिक्षकांसमोर जाहीर केले व आपल्या मंडळाचा प्रचार केलाच.
प्रत्येक जण आपल्या मंडळाने केलेली कामे मेसेजमधून सांगत आहे. तसेच, विरोधी मंडळावर संदेशातून टीका करण्याचे काम सुरू आहे. शाळेच्या वेळात सोशल मीडियावर टीका-टिप्पणीचा खेळ गुरुजींकडून खेळला जात आहे. याला राजकारणापासून अलिप्त असलेले गुरुजी मात्र वैतागले आहेत.
जिल्हा प्राथमिक बँकेची निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली आहे. या स्थगितीच्या काळात मात्र मंडळाच्या नेत्यांसह उमेदवारांनी प्रचार सुरू ठेवला आहे. या काळातच धोका होण्याची शक्यता असल्याने हा प्रचाराचा जोर कायम धरला आहे.
‘विकास’भोवती फिरतेय निवडणूक
विकास मंडळाभोवतीच शिक्षक बँकेची निवडणूक फिरत आहे. विकास मंडळाच्या जागेचा विकास कसा करता येईल, यावर आता मंडळे बोलू लागली आहेत. त्याच जागेवरून आता निवडणूक चुरशीची होणार आहे.