येणारा काळ हा युवांचा असेल -आमदार रोहित पवार

0
287
जामखेड न्युज——
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी काल राष्ट्रवादीमधील नेतृत्वावरून केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय भूवया उंचावल्या होत्या. आपल्या वक्तव्यावरून चर्चा सुरू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आता सोशल मीडियात आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला, असं सांगत खुलासा केला आहे. रोहित पवार यांनी काल एका कार्यक्रमात बोलताना 2024 च्या निवडणुकीनंतर राजकारणाची सूत्रे आपल्या हातात असतील, असा दावा केला होता. 
त्यांनी सोशल मीडियामध्ये पोस्ट करताना म्हटले आहे की, अनियंत्रित सत्ता, केंद्रीय यंत्रणा, दडपशाही यांसारख्या विविध मार्गांनी लोकशाहीवर परिणामी संविधानावर आघात होत आहे. अशा परीस्थितीत लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्याची सर्वाधिक जबाबदारी युवांवर आहे. युवावर्गाच्या सक्रीय सहभागाशिवाय लोकशाहीविरोधी शक्तींचा पराभव शक्य नाही. आदरणीय पवार साहेब आणि अजितदादांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते युवांना राजकारणात येण्याबाबत मार्गदर्शन करत असतात. त्यादृष्टीनेच मी काल युवांना सक्रीय राजकारणात येण्याचं आवाहन करताना येणारा काळ हा युवांचा असेल, असं म्हणालो.
माध्यमांनी चुकीचा अर्थ घेतला
परंतु या वक्तव्याचा माध्यमांनी चुकीचा अर्थ घेतला तर किती मोठी बातमी होते, याचा प्रत्यय काल काही माध्यमांनी दिलेल्या बातम्या पाहून आला. उलट अनेकदा लोकहिताची कामं करताना ती लोकांपर्यंत पोचणं गरजेचं असतं, पण त्याची म्हणावी तशी दखल घेतली जातेच असं नाही. मी कोणत्याही पक्षातील पदांबाबत बोललो नाही. पण लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी आमदार, खासदार, जि.प. सदस्य, नगरसेवक म्हणून युवांनी केवळ चांगल्या विचारांच्या लोकांनाच निवडून देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली.
शिवाय सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी त्या सरकारला युवांकडं दुर्लक्ष करता येणार नाही तर सशक्त युवा धोरण आखून ते राबवावं लागणार आहे. या माध्यमातून येणारा काळ आपला म्हणजेच लोकशाही विचारांचा आणि युवांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारा असेल, यात शंका नाही.
पण निर्णय मात्र नव्या पीढीचे असतील
राष्ट्रवादीचे नेतृत्व आपल्याकडे असेल असे एक प्रकारेच सुतोवाच करताना रोहित पवार म्हणाले होते की, राजकारणात प्रवेश करताना मी खूप पुढील विचार करुन आलो आहे. पदासाठी नाही, पण महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे. मात्र, दूरचे  राजकारण करताना सहकारी मित्रांना कधीच विसरणार नाही. शरद पवार आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन असेलच, पण निर्णय मात्र नव्या पीढीचे असतील असे म्हटल्याने राजकीय चर्चांना वेग आला होता. त्यामुळे आता खुलासा करण्याची वेळ रोहित पवार यांच्यावर आली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here