जामखेड न्युज——
कर्जत उपविभागातील कर्जत येथील एका केंद्रावर बारावीची परीक्षा २१ जूलै २०२२ पासून सुरू झाली आहे. कर्जत व जामखेड मधील प्रत्येकी एका केंद्रावर दहावीची परीक्षा २७ जूलै २०२२ पासून सुरू होणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अशी माहिती प्रसिद्धपत्रकाच्या माध्यमातून कर्जत चे उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) २१ जूलै ते १२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत कर्जत मधील महात्मा गांधी विद्यालय व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी ) २७ जूलै ते १२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत कर्जत मधील श्री.अमरनाथ विद्यालय व जामखेड येथील ल.ना.होशिंग विद्यालय या केंद्रावर घेण्यात येणार आहे.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा उपकेंद्राच्या २०० मीटर परिसरातील एसटीडी बुथ, फॅक्स मीटर, झेरॉक्स दुकाने बंद ठेवणे कामी परिक्षेच्या दिवशी परीक्षा क्षेत्रामध्ये सकाळी १०.३० वाजेपासून ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता कलम १९७३ चे कलम १४४ (३) लागू करण्यात आलेले आहे. परिक्षा उपकेंद्राच्या परिसरात परिक्षार्थी, प्राधिकृत सक्षम अधिकारी या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना वाहन, पायी अथवा इतर रितीने फिरण्यास, उभे राहण्यास अथवा समवेत चालण्यास या आदेशान्वये प्रतिबंधित करण्यात आले आहे. असेही डॉ. अजित थोरबोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.