जामखेड न्युज – – –
लग्न झाल्या पासून मी एकदाही वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या सासरच्या मंडळींनी देखील मला कधी आग्रह केला नाही आणि माझ्या नवऱ्याने पण कधी तसा हट्ट केला नाही. याबाबत मी भाग्यवान आहे. आपल्या समाजाला सत्यवानाची सावित्री फार लवकर समजली, परंतु ज्योतिबाची सावित्री अजून समजली नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या आणि राज्य महिलाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

पुण्यातील खडकवासला येथे एका कार्यक्रमात रूपाली चाकणकर बोलत होत्या. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
आपल्या समाजात अनेक प्रथा परंपरा सतत चालू असतात त्यामुळे प्रत्येक गावांनी या प्रथा आणि परंपरा यामधून मुक्त व्हावं, असं अव्हान त्यांनी त्यांच्या भाषणामधून केलं. शिक्षणासाठी स्वतःच्या अंगाखांद्यावर शेणामातीचे गोळे झेलणारी ज्योतिबाची सावित्री अजुनही समजली नाही पण मात्र आम्हाला वडाच्या झाडाला फेऱ्या मारणारी सत्यवानची सावित्री फार लवकर समजली हे आमचं दुर्दैव आहे, असंही त्या म्हणाल्या.
दरवर्षी आपण पाहत असतो की वटपौर्णिमेनिमित्त अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा करत त्याला फेरे मारतात. पूजा करताना त्या प्रार्थना करतात की मला सात जन्मी असाच पती मिळू दे जरी त्यांचा पती त्यांना रोज त्रास देत असेल तरी सुद्धा अशा महिला वडाच्या झाडाला त्यांच्या पती साठी प्रार्थना करतात कारण शेवटी समाज काय म्हणेल म्हणून त्यांना वडाची पूजा करावी लागते, असंही त्यांनी म्हटलं आहे.