जामखेड न्युज – – –
अंगणवाडी सेविका या समाजाच्या दिशादर्शक असून त्यांचा प्रत्येकाने सन्मान करावा असे प्रतिपादन बारामती एग्रिकल्चर डेव्हलपमेंट च्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी केले.

खर्डा येथे आयोजित शैक्षणिक गुणवत्ता व विकास कार्यक्रम व अंगणवाडी सेविका साहित्य वितरण समारंभात बोलत होत्या. यावेळी सरपंच नमिता गोपाळघरे, माजी पंचायत समिती सदस्य विजय सिंह गोलेकर, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, केंद्रप्रमुख मुकुंद सातपुते, मुख्याध्यापक राम निकम, राजू सय्यद, हरिभाऊ गोलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सुनंदाताई म्हणाल्या की, अंगणवाडीसेविका या लहान मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याचा व त्यांना शिस्त लावण्याचे काम करतात. त्यांचा योग्य तो सन्मान समाजातील प्रत्येक घटकाने करावा तसेच महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी पुढे यावे. त्यांना योग्य योग्य ते मार्गदर्शन करून व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध केले जाईल.
या कार्यक्रमात गट विकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या संकल्पनेतून खर्डा ग्रामपंचायतच्या १३ व्या वित्त आयोगातून १५ जिल्हा परिषद शाळांना धान्य मोजण्यासाठी वजन काटे तसेच २५ अंगणवाड्यांना छोटे इलेक्ट्रिक वजन काटे असे एकुण २ लाख ५० हजार रुपयांचे साहित्य सुनंदा पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
तसेच आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून सर्वांगीण विकासाचे पाच महत्त्वाचे कौशल्य यामध्ये शारीरिक आणि क्रियात्मक विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, बौद्धिक विकास, भाषा विकास व गणित विषयाची पूर्ण तयारी विकास या प्रकारचे शैक्षणिक व गुणवत्ता अंगणवाडी व शाळा स्तरावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस, अंगणवाडीतील मुले मुली व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले