“पंकजा मुडेंचा पत्ता कट करणं हे फडणवीसांचं षड्यंत्र”

0
252
जामखेड न्युज – – – – 
विधान परिषदेच्या आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळामधून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. असं असतानाच राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना तिकीट नाकारणं हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं षड्यंत्र असल्याची टीका केलीय. बुधवारी विधान परिषदेच्या उमेदवारांची घोषणा भाजपाने केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मिटकरी यांनी खोचक शब्दांमध्ये भाजपावर टीका केली.
भाजपाने पंकजा यांना डावलत महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना उमेदवारी दिली. भाजपाने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड या पाच जणांची उमेदवारी जाहीर केली. पक्षाने उमेदवारी देताना मराठा, धनगर, ब्राह्मण, ओबीसी हे जातींचे समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे. ‘‘पंकजा मुंडे यांना उमेदवारी द्यावी म्हणून फडणवीस यांच्यासह सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले होते. पण, पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला पंकजाताईंना वेगळी काही जबाबदारी सोपवायची असेल. यामुळे त्यांना उमेदवारी दिली नसावी’’, असे सांगत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंडे समर्थक नाराज होणार नाहीत याची खबरदारी घेतली.
मात्र याच निर्णयावरुन अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. “आज भाजपाकडून विधान परिषदेसाठी ज्यांची नावं समोर आली त्यामध्ये प्रामुख्याने दोन नावं नवीन आहेत. जुन्या काळात भाजपा वाढवण्यासाठी ज्यांनी जिवाचं रान केलं त्या गोपीनाथ मुडेंची कन्या पंकजा मुंडे यांचा जाणीवपूर्वकपणे विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीमधून पत्ता कट केला. हे सर्व षड्यंत्र देवेंद्र फडणवीसांचं आहे,” असं मिटकरी म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे मिटकरी यांनी पंकजा यांच्यासोबतच विनोद तावडेंनाही जाणीवपूर्वकपणे डावललण्यात आल्याचं म्हटलंय.
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपाचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. राज्यसभेप्रमाणेच भाजपाने अतिरिक्त उमेदवार उभा केला आहे. पाचवा उमेदवार म्हणून फडणवीस यांचे निकटवर्तीय व आर्थिकदृष्ट्या तगडे मानल्या जाणाऱ्या प्रसाद लाड यांना रिंगणात उतरविले आहे. बाहेरून मते आणण्याची जबाबदारी लाड यांच्यावर असेल. राज्यसभेत तिसऱ्या उमेदवाराचा प्रयोग यशस्वी झाल्यास विधान परिषदेत भाजपाचा आत्मविश्वास वाढू शकेल. राज्यसभेत तीन तर विधान परिषदेत पाचही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here