जामखेड न्युज – – – –
कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात 2019मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांचा पराभव झाला होता. विधानपरिषदेतील भाजपच्या चार जागा रिक्त झाल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील राष्ट्रवादीचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी तसेच युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या विरोधात राम शिंदे ( Ram Shinde ) यांना बळ मिळावे यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राम शिंदे यांना विधानपरिषदेचे आमदार करण्याची मागणी सुरू केली होती यानुसार पक्षश्रेष्ठींनी राम शिंदेंची विधानपरिषद उमेदवारी निश्चित केली आहे त्यामुळे कर्जत-जामखेड मधील कार्यकर्त्यांनी
एकच जल्लोष केला.
अहमदनगर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी व आगामी निवडणुकी संदर्भात भाजप मजबुतीसाठी राम शिंदे यांना विधान परिषदेची संधी मिळावी, अशी गळ अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना घातली आहे.
यानुसार भाजपाने राम शिंदे यांची उमेदवारी निश्चित केली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक आढावा घेत आगामी निवडणुकी संदर्भात विस्तृत चर्चा केली. विधानसभा निहाय माहिती घेत जिल्ह्यासाठी स्वतंत्र वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच अहमदनगर जिल्ह्याच्या प्रभारीपदी निवड झाल्यामुळे जिल्ह्यातील आगामी सर्वच निवडणुकांना महत्वप्राप्त झाले. राज्य पातळीवरील नेतृत्वाला अहमदनगर जिल्ह्यात संधी मिळाल्याने निवडणुकांमध्ये चुरस निर्माण होणार आहे. जिल्ह्यात येऊन दोन विधानसभा निहाय संयुक्त बैठका घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत तीन जिल्हाध्यक्षांना माहिती संकलित करुन, अहवाल तयार करावे, असेही यावेळी सूचविण्यात आले.
भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी माजी मंत्री राम शिंदे तालुकाध्यक्ष पदापासून प्रदेश उपाध्यक्ष पदापर्यंत पक्षातील संघटनात्मक कामांमुळे पोहचले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 12 ही विधानसभा मतदार संघात पालकमंत्री असतांना सर्वांना न्याय देण्याची भुमिका घेतली होती. जिल्ह्यात भाजपला गतवैभव मिळवून द्यावयाचे असेल तर राम शिंदे यांना आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत संधी देण्यात यावी. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये नव्याने निर्माण झालेल्या ओबीसी खात्याचे मंत्री असतांना राज्यातील ओबीसी व भटक्या समाजाला त्यांनी न्याय मिळावून दिला. राज्य पातळीवर प्रतिष्ठेची समजली जाणारी कोअर कमिटी सदस्यपदी निवड झाल्यामुळे राम शिंदे यांचा संघटनेने सन्मानच केला आहे. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यात पक्ष बळकटीसाठी त्यांना संधी मिळावी, असे निवेदनात म्हटले होते याचा विचार करून उमेदवारी जाहीर केली आहे. हे समजताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला व अनेकांनी मुंबईकडे कुच केली










