जामखेड न्युज – – –
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती म्हणजे खऱ्या अर्थाने देशातील सर्व महिलांना सन्मान मिळवून देणारा हा सोहळा आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे मंगळवारी काढले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी (ता. जामखेड, जि. नगर) येथे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून मंगळवारी शासकीय सोहळा झाला. यावेळी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री अण्णा डांगे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले, की आपल्या देशात अनेक महान महिला होऊन गेल्या. त्यापैकी राजमाता जिजाबाई, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचे नाव सर्वत्र अग्रक्रमाने घेतले जाते. मला कोणाची तुलना करायची नाही. मात्र, अहिल्यादेवींचे कार्य सर्वसमावेशक आहे. त्या खऱ्या अर्थाने ‘पुण्यश्लोक’ आहेत. त्यांनी कौटुंबिक संकटाच्या काळात राज्याची सूत्रे हातात घेऊन वेगळय़ा प्रशासकीय कौशल्याचा ठसा उमटवला. हाती असलेल्या सत्तेचा जनतेच्या हितासाठी कसा वापर करता येतो, हे त्यांनी दाखवून दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व धर्म-जातींत कुठलाही भेदभाव न करता त्यांनी चालवलेले प्रशासन हे आजच्या राजकीय नेत्यांसाठी पथदर्शक आहे, असा टोला त्यांनी विरोधी पक्षाला लगावला.
यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले, की चौंडी येथील अहिल्यादेवी जयंती यापुढे शासनातर्फे साजरी केली जाईल. यासाठी राज्य सरकारकडून २५ लाखांचा निधी आजच मंजूर करत आहे.
रोहित पवार यांचे कौतुक
यावेळी शरद पवार यांनी त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांचे विशेष कौतुक केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी रस्ते, पाणी आणि रोजगारवाढीसाठी प्रयत्नपूर्वक काम केले. त्यांच्याच दृष्टिकोनाचा स्पर्श या भागाचे आमदार रोहित पवार यांना झाला आहे. या भागातील जनतेने साथ दिली तर आगामी काही वर्षांत मतदारसंघाच्या चेहरामोहरा बदलाचा इतिहास या ठिकाणी नक्कीच घडेल, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.
आमदार गोपीचंद पडळकर यांना रोखले!
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी वाफगाव ते चौंडी ही जनजागृती यात्रा काढली होती. तसेच त्यांनी या ठिकाणी जाहीर सभेसाठी शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणीही केली होती. त्यांची यात्रा सकाळी साडेअकराला कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे येताच पोलीस-प्रशासनाने त्यांना अडवले. तब्बल दोन तास गोपीचंद पडळकर यांचा ताफा पोलिसांनी अडवून धरला होता. यामुळे या ठिकाणी समर्थकांनी प्रचंड गोंधळ, धक्काबुक्की, घोषणाबाजी केली. मात्र चौंडी येथील जयंती सोहळा संपल्यानंतरच पडळकरांना चौंडीकडे जाऊ देण्यात आले.