जामखेड न्युज – – – –
कधी येणार कधी येणार म्हणता म्हणता म्हणता आता मान्सून अखेर तुमच्या दाराशी येऊन ठेपला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून गोवा आणि कोकणाच्या दिशेने सरकेल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर, देशात यावर्षी दिलासादायक पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सध्या मान्सून कर्नाटकात असून, तिथून पुढं आता तो थेट महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे.
हवामान विभागाने मान्सूनबाबत दुसरा अंदाज जारी केलाय. यावर्षी देशात 96 टक्के ते 104 टक्के पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला. मान्सून कोअर झोन म्हणजे शेती सर्वाधिक असलेल्या मध्य भारतात सामान्य पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
देशाच्या 4 भागांचा विचार केला तर, मध्य भारतात सामान्य म्हणजे 106 टक्के दीर्घकालीन पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हाच अंदाज दक्षिण पेनिन्स्युलामध्ये 106 टक्के तर ईशान्य भारतात 96 ते 106 टक्के दीर्घकालीन पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पावसाळ्यात संकटांशी दोन हात करण्यासाठी प्रशासन सज्ज
दरम्यान, पावसाचा अंदाज आणि अतिवृष्टीचा इशाराही पाहून नैसर्गिक आपत्तीचाही तडाखा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपत्तींचा धोका लक्षात घेऊन पावसाळ्याआधीच NDRF च्या ९ तुकड्या ७ जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात येणार असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापनानं दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. पूर आल्यास बचावकार्यात वेळ लागू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रथमच NDRF तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत. दरम्यान, धरणातून पाण्याचा विसर्ग होताना अभियंत्यानी मुख्यालय सोडू नये, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.