जामखेड न्युज – – –
चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या 297 व्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जयंती होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची, पण याला आज राजकीय आखाड्याच्या वादाचे स्वरुप प्राप्त झालं. आमदार रोहित पवारांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. पण त्याला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी विरोध करत निषेध नोंदवलामूळ कार्यक्रम बाजूला राहिला आणि राजकीय नेत्यांची स्टंटबाजी आणि भाषणबाजीच जास्त झाल्याची भावना लोकांमध्ये होती.
शरद पवार यांचेकडून रोहित पवारांचे कौतुक
चौंडीतील आजच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी उपस्थिती लावली होती. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचे कौतुक केलं. कर्जत-जामखेडमध्ये गेल्या अडीच वर्षांमध्ये रोहित पवारांनी ज्या प्रकारे काम केलं आहे ते पाहता त्यांच्या कामात अहिल्याबाईंच्या दृष्टीकोनाचा स्पष्ट विचार दिसतोय असं शरद पवार म्हणाले. रोहित पवारांनी आजच्या कार्यक्रमात धनगर बांधवांसोबत ढोल वाजवण्याचा लुटला आनंद लुटला. यावेळी धनगर बांधवांकडून भंडारा लावत रोहित पवारांचा सत्कार करण्यात आला.
आजचा कार्यक्रम राष्ट्रवादीने हायजॅक केल्याची भावना भाजप नेत्यांमध्ये होती. जिल्ह्यातल्या सगळ्याच भाजप नेत्यांनी रोहित पवार आणि त्यांच्या या कार्यक्रमातल्या सहभागावर आक्षेप घेतला होता, आणि त्यामुळेच या कार्यक्रमात हजर राहून निषेध नोंदवण्याचा इरादा गोपीचंद पडळकरांचा होता.
पडळकरांना पाच किमी आधीच अडवलं
पण पडळकरांचा हाच पवित्रा रोखण्याची आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची सगळी तयारी पोलिसांनी केली होती. त्यामुळे चौंडीच्या पाच किलोमीटर आधीच पडळकरांना आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी रोखून धरलं होतं. यामुळे पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते भडकले आणि त्यांची पोलिसांसोबत हमरीतुमरी सुरु झाली. कार्यक्रम स्थळापासून काही किलोमीटरवर इतका राडा सुरु असताना तिकडे चौंडीमध्ये मात्र कार्यक्रम सुरळीत सुरु होता.
पडळकरांना खांद्यावर उचलून नेलं
चौंडी येथील कार्यक्रम हा तीन तासापर्यंत सुरू होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी रस्ता खुला करण्यात आला. चौंडीला पोहचल्यावर कार्यकर्त्यांनी पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना खांद्यावर उचलून अहिल्यादेवी कीर्तीस्तंभाच्या दर्शनाला नेलं. त्यानंतर पडळकर, राम शिंदे, सदाभाऊ खोत यांनी भाषण केलं.
पुढच्यावेळी असं कराल तर याद राखा, पडळकरांचा इशारा
भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, “पुढच्या जयंतीला असा घाट घालाल तर याद राखा. आजच्या सभेला लावलेला पैसा हा भ्रष्टाचाराचा पैसा आहे. जयंतीचा राजकारण कराल तर आज जसं आजोबा-नातवाला तोंडांवर पाडलं तसं पाडत राहू. शरद पवार नावाच्या माणसानं आपल्या चार पिढ्या बरबाद केल्या. त्यांचं नवं व्हर्जन रोहित पवार हे ही पुढच्या चार पिढ्या बरबाद करतील. शरद पवार हे जयंतीसाठी आले नाही तर ग्रामपंचायतची 80 एकर जामीन हडपण्यासाठी आले.”
आजपर्यंत चौंडीला सर्व समावेशक जयंती साजरी होत होती. पण पवार कुटुंबीय, रोहित पवार त्यात राजकारण आणत आहेत, ते समाजाचे अस्तित्व असलेल्या चौंडीत आक्रमण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. त्यांनी असे केले तर आम्ही त्यांना मातीत घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा गर्भित इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला होता.
नातवाच्या काळजीसाठी पवार चौंडीला, राम शिंदेंचा आरोप
माजी मंत्री राम शिंदे म्हणाले, शरद पवार आता नातवाच्या काळजीसाठी चौंडीला आले आहेत. पुढच्या वर्षी जयंती कशी करायची हे आम्ही ठरवणार. माजी मंत्री राम शिंदे यांचा आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. शिंदे म्हणाले, या जयंतीला आमदार रोहित पवारांकडून राजकीय स्वरूप देण्यात आले असून हा जयंती उत्सव नसून राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा असल्याची टीका राम शिंदेंनी केलीय. दरम्यान, अहिल्यादेवी भक्तांची कुचंबना होतेय, या जयंतीला राजकीय स्वरूप देणे चुकीचे आहे. प्रशासनावर राजकीय दबाव देण्यात येत असल्याचा आरोप शिंदेंनी केलाय.
पडळकरांनी बिरोबाची शपथ घेऊन ती पाळली नाही, रोहित पवारांची टीका
आमदार गोपीचंद पडळकरांच्या या टीकेला उत्तर देताना आमदार रोहित पवार म्हणाले की, गोपीचंद पडळकर चांगली अॅक्टिंग करतात. आजच्या कार्यक्रमाला लोकांनी मोठी गर्दी केल्याने त्यांची चिडचिड होतेय. त्याचसाठी पडळकरांनी आजचा स्टंट केला. पडळकरांचे भाषण हे थर्ड ग्रेडचं होतं. मातीत घालायचं की नाही ते लोक ठरवतील. रोहित पवार लहानपणापासून किती वेळा इथे आला ते बघा. मागच्या वेळी राम शिंदे यांची सभा उधळून लावली. कारण तुम्हाला टीव्हीवर दिसायच होतं. त्यांची मागच्या चार दिवसांची भाषणं ऐकली तर दगडफेक करा अशा स्वरूपाची होती त्यामुळे पोलीस कारवाई करणारच. आजच्या कार्यक्रमाला 90 टक्के धनगर लोक होती, मग ते पैसे घेऊन आले असं म्हणायचं आहे का? असं म्हणताना लाज वाटायला पाहिजे. राम शिंदे यांना म्हणावं समोर येऊन बोला. इथं सगळ्यात चांगली वास्तू म्हणजे राम शिंदे यांचा बंगला आहे. जर तुम्हाला या गावासाठी काही तरी चांगलं केलं असतं. ज्यांनी बिरोबाची शपथ घेऊन ती पाळली नाही त्यांना हिंदू धर्म काय कळला?
चौंडीतल्या या कार्यक्रमाला इतकं महत्त्व का?
चौंडी हे अहिल्यादेवीचं जन्मस्थान आहे. चौंडी हे समस्त धनगर समाजाचं श्रद्धास्थान आहे. देशभरातले धनगर इथे दर्शनाला येतात. प्रत्येक पक्षाला धनगरांचा पाठिंबा हवा आहे आणि आगामी निवडणुकींमध्ये धनगर समाजाची मतं महत्त्वाची आहेत. त्यामुळेच प्रत्येक पक्षाच्या वतीने या मतांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जातात.
खरं तर अहिल्यादेवींना नवनिर्माणाच्या प्रणेत्या असं म्हटलं जातं. त्यांच्याच कर्तृत्वामुळे देशभरात नदीकिनारी घाट उभे राहिले, त्यांच्याच कृपेने हजारो बारवांमधून देशाची तहान भागली. इतकं शाश्वत काम करणाऱ्या अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी ही श्रेयवादाची लढाई खरंच गरजेची होती का?