जामखेड न्युज – – – – –
यंदा वेळेआधी मान्सूम दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. अनुकूल वातावरण आणि वार्याची योग्य दिशा यामुळे मान्सून पुढे सरकत आहे. परिणामी येत्या दोन ते तीन दिवसांत म्हणजेच ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. मान्सूनचा प्रवास असाच सुरू राहिल्यास महाराष्ट्रात साधारण ७ ते १० जूनच्या दरम्यान मोसमि पावसाचे आगमन होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.यावर्षी मान्सून २७ मे रोजी म्हणजे सर्वसाधारण तारखेपेक्षा पाच दिवस आधी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला होता. मात्र, मान्सूनला केरळमध्ये दाखल होण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे आयएमडीने स्पष्ट केले. दरम्यान, ‘दक्षिण अरबी समुद्रात जमिनीलगत पश्चिमेकडून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा जोर वाढत असून, त्यांची उंचीही वाढताना दिसत आहे. केरळ किनारपट्टी लगतच्या क्षेत्रात ढगांची गर्दीही दिसून येत आहे.
बंगालच्या उपसागरातील दक्षिण भागासह अंदमान समुद्र, तसेच अंदमान-निकोबार बेटांवर मागील पाच ते सहा दिवसांपासून रखडलेल्या मान्सूनला पुढे वाटचाल करण्यास गुरुवारपासून अनुकूल स्थिती तयार झाली. कमी दाबाचे वाढलेले पट्टे, तसेच वार्याची योग्य दिशा आणि बाष्प यामुळे थांबलेला मान्सून पुढे सरकण्यास सुरुवात झाली. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत म्हणजे ३० मेपर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होण्याची दाट शक्यता आहे.दरम्यान, येत्या काही दिवसांत आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तमिळनाडू, पुदुच्च्चेरी आणि कराईकल या भागात अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. उत्तरेकडे जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातही येत्या चार दिवसांत पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड, उत्तर पंजाब, उत्तर हरयाणा, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान येथे दोन-तीन दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.