संभाजीराजे राज्यसभा निवडणूक लढणार नाहीत? 

0
190
जामखेड न्युज – – – – 
 कोल्हापूरचे संभाजीराजे (Sambhajiraje) राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. येत्या काही वेळातच संभाजीराजे पुण्यातून सदर घोषणा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील वेळी राज्यसभेवर संभाजी राजेंना भाजपतर्फे पाठिंबा देण्यात आला होता. यंदा त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. याकरिता सर्वपक्षीय पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी विनंती केली होती. शिवसेनेने अपक्षांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्याऐवजी शिवसेनेत आल्यास आम्ही उमेदवारी देऊ, असा प्रस्ताव संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला होता. मात्र संभाजीराजेंनी हा प्रस्ताव फेटाळल्याने शिवसेनेने राज्यसभेवर दुसरा उमेदवार उभा केला. अशा रितीने राज्यसभेची (Rajya Sabha Election) जागा विजयी होण्यासाठी मतांचं गणित जमणार नसल्याची चिन्हं दिसल्याने संभाजीराजे निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. पुढील काही वेळातच यावर शिक्कामोर्तब होईल.
‘मी जनतेशी बांधील’ फेसबुक पोस्टचा रोख कुठे?
दरम्यान, संभाजीराजेंनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट शेअर केली असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतानाच फोटो त्यात शेअर केला आहे. मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतलं स्वराज्य घडवायचं आहे. मी त्यांच्या विचारांशी कटिबद्ध असेन. मी फक्त जनतेशी बांधील आहे, असा मजकूर त्यांनी या पोस्टमध्ये लिहिला आहे. या फेसबुक पोस्टचा रोख नेमका कोणत्या दिशेने आहे, यावर तर्क वितर्क लावले जात आहेत. ही पोस्ट शिवसेनेच्या दिशेने रोख करतेय, अशीही चर्चा आहे. मात्र पुढील काही वेळातच संभाजीराजे यामागील भूमिका स्पष्ट करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here