मनसेने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी -आमदार रोहित पवार

0
220
जामखेड न्युज – – – – 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सचिव सचिन मोरे यांनी आज सकाळी शेअर केलेल्या फोटोंवरून सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या फोटोंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे या राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यासोबत दिसून येत आहेत. यावरून राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी बृजभूषण सिंह यांना शरद पवारांनीच रसद पुरवल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून शेअर करण्यात आलेल्या फोटोंवरून राजकारण रंगलेलं असताना आता त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मनसेला प्रत्युत्तर दिलं आहे. मनसेने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी असेही म्हटले आहे
बृजभूषण सिंह यांचा खुलासा!
सचिन मोरे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे बृजभूषण सिंह यांच्यासोबत एका कार्यक्रमाच्या स्टेजवर दिसून येत आहेत. हे फोटो नेमके कुठले आहेत, याविषयी नेमकी माहिती नसली, तरी एका कुस्तीच्या कार्यक्रमातले हे फोटो असल्याचं दिसून येत आहे. बृजभूषण सिंह यांनी या फोटोंविषयी खुलासा करताना शरद पवारांबाबत आदर व्यक्त केला आहे. “शरद पवार देशाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. महाराष्ट्र कुस्ती संघासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. आम्ही कुस्तीसाठी जे काम केलं, त्यासंदर्भात ते माझं कौतुक करत होते. तीन दिवसांपर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या माळा शरद पवारांसाठी येत होत्या, त्या मला घातल्या याचा मला गर्व आहे. माझे संबंध आहेत त्यांच्याशी”, असं बृजभूषण सिंह म्हणाले आहेत.
“राज ठाकरेंबद्दल मला आदर आहे”
दरम्यान, फोटोंवरून सुरू असलेल्या या राजकारणावर रोहित पवारांनी खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “राज ठाकरे राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजपा आपला वापर करून घेतंय, तरी मनसेला हे कसं कळत नसेल? खासदार बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये”, असं रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर…”
“राहिला प्रश्न आदरणीय शरद पवार साहेब आणि खा. बृजभूषण सिंह यांच्या एकत्रित फोटोचा. तर पवार साहेब हे अनेक वर्षे ‘महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे’चे अध्यक्ष आहेत आणि खा. बृजभूषण सिंह हे ‘भारतीय कुस्ती संघा’चे अध्यक्ष आहेत. मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळे संभाव्य अपघात टळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल”
, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
दरम्यान, यासंदर्भात अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे आणि शरद पवार यांचा दुसरा फोटो ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे. अमोल मिटकरींनी आपल्या ट्वीटसोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिसत आहेत. या फोटोमध्ये राज ठाकरे शरद पवारांना हातात हात देत एका कार्यक्रमातल्या स्टेजवर चढण्यासाठी मदत करत असल्याचं दिसून येत आहे. हा फोटो नेमका कधीचा आहे, हे मिटकरींनी ट्वीटमध्ये म्हटलेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here