जामखेड न्युज – – – –
प्रत्येक गावाचा वेगळा इतिहास असतो आणि वेगवेगळ्या प्रथाही असतात. त्यामुळे गावागावात लोकं अनेक वर्षांपासून अशा प्रथा पाळत असतात. अशीच काही आगळीवेगळी प्रथा औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील चौंढाळा गावाची आहे. कारण या गावात चक्क लग्न लागत नाही. त्यामुळे एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न ठरलं तर त्यांना थेट गावाबाहेर जाऊन लग्न लावावं लागतं. विशेष म्हणजे या गावात ना दुमजली घर आहे, ना कुणाच्या घरात झोपण्यासाठी खाट आहे. त्यामुळे या गावाची आगळीवेगळी प्रथा चर्चेचा विषय ठरत आहे.
ADVERTISEMENT 

औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड पैठण रोडवर चौंढाळा नावाचं गाव. 700 लोकवस्तीच्या या गावात रेणुका देवीचं पुरातन मंदिर आहे. ते माहूरच्या देवीचं उपपीठ म्हणून ओळखलं जातं. देवीवरील श्रद्धेपोटी किंवा भीतीमुळे शेकडो वर्षांपासून अनेक प्रथा इथे पाळल्या जातात. गावातील मुलीचं किंवा मुलाचं लग्न ठरलं, तर गावाबाहेर जाऊन लग्न लावावं लागतं. लग्न जमलेल्या मुला-मुलींची लग्नं एक तर परगावी केली जातात किंवा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवेजवळील मारोतीच्या मंदिरात लावले जातात. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार रेणुका देवी अविवाहित राहिली आणि तिचा आदर करण्यासाठी, किंवा तिचा कोप होऊ नये म्हणून या गावात आजही लग्न लावली जात नाहीत. त्यामुळे गावात ही प्रथा गेल्या हजारो वर्षांपासून पाळली जात असून आजही लग्न गावाच्या बाहरेच लावले जातात.
दुमजली घरही नाही….
ज्याप्रमाणे या गावात लग्न लावली जात नाही त्याचप्रमाणे गावात कुठेच दुमजली घर सुद्धा बांधली जात नाही. कारण देवीच्या घरापेक्षा आपलं घर उंच असू नाही अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे.त्यामुळे या गावात प्रत्येक घर एकमजलीच असून त्यापेक्षा एकही घर उंच असल्याचं दिसून येत नाही.
गावकरी जमिनीवरच झोपतात
या गावात आणखी एक प्रथा पाळली जाते आणि ती म्हणजे या गावात कुणीच खाटेवर किंवा पलंगावर झोपत नाही. त्यामुळे गावात कुणाच्याही घरात बाज, कॉट नाही. त्यासाठी पर्याय म्हणून गावातील घरांमध्ये बाजेच्या आकाराचे सिमेंटचे ओटे बनवण्यात आले असून त्यावरच गावकरी झोपतात. त्यामुळे तुम्हा आम्हाला ही प्रथा आगळीवेगळी आणि थोडीशी विचित्र वाटत असली तरीही येथील गावकरी मात्र हजारो वर्षांपासून ह्या प्रथा अखंडपणे पाळतायत.