जामखेड न्युज – – – – –
मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंखोसे कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है…म्हणतात ते उगीच नव्हे, शाळा शिकत असताना एकेकाळी पायात चप्पल नव्हती, परंतु ध्येय आणि स्वप्न मोठी होती. त्याच स्वप्नांना उराशी बाळगून, हलाखीच्या परिस्थितीत अडथळ्यांच्या शर्यतीवर मात करत. खडकाळ पायवाटेवरून धावत स्वप्नांचा पाठलाग करून विविध स्पर्धामध्ये २७ सुवर्ण, १३ कांस्य, १७ रौप्यपदकांची लयलूट करून भारतातील नंबर वन आंतरराष्ट्रीय धावपटू, भारताची सुवर्णकन्या, मोहिची वायुकन्या म्हणून नावलौकिक मिळवलेल्या या शेतकरी कन्येची मैदानातून थेट प्रशासनात उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झालेल्या साताऱ्याचा कन्या, तथा सोलापूरच्या सुनबाई ललिता बाबर-भोसले त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा.
ADVERTISEMENT 

आंतरराष्ट्रीय धावपटू, तथा उपजिल्हाधिकारी ललिता बाबर त्यांच्या या यशाबद्दल सांगतात की, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील चारशे ते पाचशे उंबरठ्याचे मोही गाव. गावातील बाबर वस्तीवर 16 सदस्यांचे एकत्रित शेतकरी कुटुंब. आई-वडील दोघेही निरक्षर मात्र शिक्षणाच्या बाबतीत चांगलेच साक्षर होते. ‘मुलगी शिकली तरच प्रगती होईल’ या आशेने आई-वडिल माझ्यासह इतर चार बहिण भावंडांच्या शिक्षणासाठी व संसाराचा गाडा ओढण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असत. त्यांचे कष्ट बघूनच सकाळी शाळा भरण्याअगोदर, दहा वाजेपर्यंत जनावरांना वैरण-पाणी करून अनवाणी पायाने धावतच शाळा गाठायची. त्यामुळे रस्त्यावरील टोकदार चिपऱ्या दगडांचे टोचणे ठेच लागणे हे नित्याचेच असल्याने, सवयीचे झाले होते. शाळेच्या वेळेत पोचण्यासाठी धावत धावत कधी तरी देशासाठी धावेल असे कधी त्यावेळी वाटले नव्हते.धावण्याचा रोज सराव असल्याने, त्यात चांगलाच हातखंडा बसला होता. त्यामुळे विद्यार्थिदशेत असताना त्यावेळी शाळेतील शिक्षकांनी माझ्या अंगातील क्रीडा गुण ओळखून, त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे धावण्याच्या विविध शर्यतीकरता तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर धावु लागले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने, अनेक स्पर्धेला जाण्यासाठी शिक्षक ही आर्थिक मदत करत. आलेल्या बक्षीस स्वरूप पैशातून घरखर्चासाठी मदत व ॲथलेटिक्सकरता खर्च करू लागले.
धावणे हे आयुष्यचे स्वप्न झाले. त्यातच करिअर करायचे यासाठी आवडी-निवडी, सणवार, उत्साहाच्या अन् आनंदाच्या कोणत्याही मोहात न पडता मी वेड्यागत धावत राहिले.यशाचा मोठा पल्ला गाठणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. त्यामुळे ऑलम्पिक मध्ये खेळावे हे माझे स्वप्न होते. परंतु, घरची परिस्थिती जेमतेम या चाकोरीतून बाहेर पडत वेगळी वाट निर्माण करणे जिकीरीचे होते. तरीही मोठ्या धाडसाने मी ही वाट निवडली होती. प्रत्येक पावलावर आव्हानांचा सामना करावा लागला. गावात चांगले मैदान नव्हते, चांगला रस्ता नव्हते. त्यामुळे मोकळ्या शेतात किंवा कच्च्या रस्त्यावरच सराव सुरू असायचं. त्यावेळी अंगावरील कपडे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील अनेक जण टीकाटिपणी करायचे, पण आई-वडील निमूटपणे सहन करून, खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. त्यांना खात्री होती या क्षेत्रात मी नावलौकिक मिळेल.जिद्द अफाट होती पण घरच्या परिस्थितीकडे कधीही कानाडोळा करता येत नव्हता. मात्र धावत्याला मार्ग सापडतो हेच ब्रीद वाक्य मला सातत्याने प्रेरणा देत होते. कारण मी थांबले तर माझा सर्व परिवार थांबेल. त्यामुळे मी धावत राहिले. प्रथम शिखर शिंगणापूर येथे तीन किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा भरली होती. त्यावेळी अनवाणी पायांनी पहिला नंबर पटकाविला. खऱ्या अर्थाने इथूनच करिअरला दिशा मिळाली. त्यानंतर नॅशनल फेडरेशन ने घेतलेल्या सबज्युनियर ॲथेलेटिक्स स्पर्धेत भाग घेतला. त्यात अंतिम पहिल्या पाच मुलींमध्ये स्थान पटकाविले. त्यानंतर छत्तीसगडमधील कोरब येथे स्पर्धेत पहिले सुवर्ण मिळाले. त्यानंतर विविध स्पर्धत ॲथलेटिक्समधिल यश फुलत राहिले. त्यात भर पडली ती पुणे येथे झालेली क्रॉस कंट्री स्पर्धा. यामध्ये सुवर्ण पदक मिळाले व रेल्वेमध्ये ‘टीसी’ म्हणून नियुक्तीही मिळाली.घर खर्चासाठी मदत करू लागल्याने, आनंद वाटु लागला. पुढे या सर्व कामगिरीची दखल भारतीय ॲथेलेटीक्स महासंघाने घेऊन, प्रशिक्षणासाठी निवड केली. परंतु चेन्नई येथे नॅशनल स्पर्धेच्या मैदानात दुखापत झाली. त्यामुळे जवळपास दोन वर्षे मैदानापासून दूर राहावे लागले. नंतर पुन्हा 2009 पासून फिनिक्स भरारी घेत मैदानात उतरले. एक-एक स्पर्धा पार पाडत राहिले. या सर्वाच्या कष्टाचे चीज 2015 मध्ये बिजिंग येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सर्व रेकॉर्ड मोडत सुवर्ण पदक पटकाविले आणि ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली.एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी, घरात कोणत्याही सुखसुविधा नव्हत्या, कधीकाळी पायात सिल्पर घालून पळायचे, तब्बल 17 वर्ष धावत राहिले. त्यामुळे हा क्षण माझ्या दृष्टीने खुपच अविस्मरणीय होता. तिथे पदक मिळालं नाही तरी, अंतिम फेरी गाठल्यामुळे गावापासून राष्ट्रपतीपर्यंत सर्वांनी स्वागत करून अभिनंदन केलं. खऱ्या अर्थाने खेडेगावातच खरं नैपुण्य असतं. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरीही, जर तुमच्याकडे जिद्द व महत्त्वाकांक्षा असेल तर तुमच्या मार्गात कोणताही अडथळा येत नाही. याची प्रचिती आली.याकाळात प्रशासनात कार्यरत असलेल्या संदीप भोसले यांच्याशी विवाह झाला. त्याचबरोबर जागतिक स्तरावर विविध क्रीडा स्पर्धामध्ये देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना थेट शासकीय सेवेत नियुक्त्या देण्याच्या धोरणानुसार राज्य सरकारने 2018 मध्ये थेट उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देत माझ्या कार्याचा सन्मान केला. सध्या विधानपरिषदेच्या सभापतींचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे.





