जामखेड न्युज – – – –
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्य महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे मार्चपासून हे पद रिक्त होते. आता या पदावर विद्या चव्हाण यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. राज्यातले विविध प्रश्न यानिमित्ताने हाताळणार असल्याचे विद्या चव्हाण यांनी सांगितले.
राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष या पदावरची ही नियुक्ती स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले. महागाईसारख्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. महिला वर्ग त्रासला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक महिला पक्षात चांगले काम करत आहेत. मला पक्षाने संधी दिली आहे आणि जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र ठरेन, असे त्या म्हणाल्या. त्याचबरोबर माध्यमाकडूनही सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली. दरम्यान, मार्चमध्ये रुपाली चाकणकर यांनी महिला अध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपविला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते.
विभागवार नियुक्तीपत्रे
नागपूर विभाग अध्यक्षा शाहीन हकीम (गडचिरोली), अमरावती विभाग अध्यक्षा वर्षा निकम (यवतमाळ), मराठवाडा विभाग अध्यक्षा शाजिया शैख (जालना), वैशाली मोटे (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता म्हेत्रे (सातारा), वैशाली नागवडे (पुणे), कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे (सिंधुदुर्ग), ठाणे विभाग अध्यक्षा ऋता आव्हाड (ठाणे), उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता परदेशी आदींची नियुक्तीही खासदार फौजिया खान यांनी जाहीर केली.