जामखेड न्युज – – – – –
कोतूळ (ता. अकोले) येथे पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व अभ्यासकांकडून संशोधनासाठी खोदकाम सुरू आहे. या कामात अभ्यासकांच्या हाती महत्वपूर्ण पुरावे लागले आहेत. हे पुरावे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे आहेत. त्यामुळे कोतूळला सातवाहन काळाचा इतिहास असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.
उत्खनन टीमचे प्रमुख डॉ. पांडुरंग साबळे यांनी या संशोधनाची माहिती दिली आहे. गेल्या दिवसांपासून सुरू असलेल्या उत्खननाच्या दुसऱ्या थरांमध्ये लाल काळया रंगाच्या छटा असलेली खापरे, पहिल्या शतकातील पाण्याची विहीर, धान्याचा रांजण, विश्रांतीचा ओटा, चूल, जनावरांचा गोठा, हाडे, लेंड्या, खेळण्यातले भिंगरीचे चाक,
सिलीकेट धातूचा काचसदृश्य निळा मणी, तांब्याची पहिल्या आणि दुसऱ्या शतकातली चलनी नाणी सापडली आहेत. त्यामुळे कोतूळच्या उत्खननाचा इतिहास दोन हजार वर्षांपूर्वीच्या म्हणजे सातवाहन काळात जाऊन पोहचला असल्याचे सांगण्यात आले.





