लग्नानंतर पाचव्या दिवशी तीन लाखांचे दागिने घेऊन नववधू पसार

0
365
जामखेड न्युज – – – – 
 पाच दिवसांपूर्वी थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. त्यानंतर तीन दिवसांनंतर सत्यनारायणाचा कार्यक्रमही पार पडला. पण लग्नाच्या पाचव्या दिवशी दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी जोडपे गेलं आणि पतीला किल्ल्यात जाण्यासाठी तिकीट काढेतोपर्यंत मी काहीतरी खाद्यपदार्थ आणते सांगून नववधू तीन लाखांवरील दागिने घेऊन पसार झाली. तर खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथील राजेश प्रकाश लाटे (२६) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव असून, शुभांगी प्रभाकर शिंदे असे फसवणूक करणाऱ्या नववधूचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेशचा २६ मार्च रोजी शुभांगी शिंदे या तरुणीसोबत मावसाळा इथे थाटामाटात विवाह झाला. त्यानंतर तीन दिवसांनंतर सत्यनारायणाचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, लग्नाच्या पाचव्या दिवशी नवरदेव राजेश आणि नववधू शुभांगी हे दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी गेले. किल्ल्यावर पोहचल्यावर शुभांगीने राजेशला ‘तुम्ही किल्ल्यात जाण्यासाठी तिकीट काढा, मी काही खाण्याचे पदार्थ खरेदी करते,’ असे सांगितले.
यामुळे राजेश तिकीट काढण्यासाठी गेला, पण बराच वेळ झाला शुभांगी परत येत नसल्याने राजेश मुख्य रस्त्याकडे आला. तेव्हा तेथील काही दुकानदारांना विचारपूस केली असता, शुभांगी एका बोलेरो गाडीत बसून गेल्याचे काही जणांनी सांगितले. नंतर राजेशने दौलताबाद पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. विशेष म्हणजे १८ हजारांची मण्यांची सोन्याची पोत, ८,५०० रुपयांचे दीड ग्रॅमचे मंगळसूत्र, ८ हजारांचे कानातले, ४ हजार ७०० रुपयांची पायातील चांदीची चेन आदी मुद्देमाल घेऊन शुभांगीने पोबारा केला.
असा लावला चुना…
मुलगी शोधत असताना राजेश कदम नावाच्या दलालासोबत ओळख झाली. त्यानंतर कदम याने रामप्रसाद नावाच्या व्यक्तीसोबत ओळख करून देण्यासाठी मुलाचे वडील प्रकाश लाटे यांच्याकडून ५ हजार ५०० रुपये घेतले. त्यानंतर रामप्रसादने बबन म्हस्के नावाच्या आणखी एकासोबत ओळख करून देण्यासाठी ३ हजार रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा बबन म्हस्के यानेसुद्धा आशाबाई भोरेसोबत ओळख करून देण्यासाठी ३ हजार घेतले. त्यानंतर मुलगी पाहिली आणि आशाबाई भोरे आणि बबन म्हस्के यांनी सोयरीक जुळवण्यास १ लाख ३० हजार घेतले, असे प्रकाश लाटे यांना १ लाख ४१ हजार ५०० रुपये गंडा घालण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here