जामखेड न्युज – – – – –
कोरोनाकाळात आपले पती गमावलेल्या महिलांना व संरक्षणाची गरज असलेल्या निराधार मुलांना अडचण येऊ नये यासाठी जामखेडच्या राज लॉन्स येथे आमदार रोहित दादा पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून मिशन वात्सल्य बाल संगोपन व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ सह तालुक्यातील अधिकारी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्या मुलांचे आईवडील या जगात नाहीत किंवा कोरोनाकाळात आई वडीलांचे छत्र हरवलेल्या मुलांना तसेच दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या मुलांसाठी नगरहून बाल कल्याण समिती आली होती. त्यांच्या अटीच्या निकषात बसणाऱ्या मुलांना प्रत्येकी 2500 रुपये त्यांच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत मिळणार आहेत.
यासोबतच ज्या महिलांचे पती कोरोनाकाळात मृत पावले आहेत, अशा निराधार विधवा महिलांना शासनाच्या विविध विभागातील योजनांचा फायदा कसा घेता येईल, या संदर्भातही माहिती देण्यात आली. या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग, कृषी विभाग, पशू संवर्धन विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, शालेय शिक्षण विभाग तसेच बाल कल्याण समिती यांनी सहभाग नोंदवला होता.
संबंधित कार्यक्रम हा आमदार रोहित दादा पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच या मेळाव्यासाठी एकूण 1500 निराधार मुले व विधवा महिलांनी नोंदणी केली होती. या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणात मतदारसंघातील निराधार मुले व विधवा महिलांना फायदा होणार आहे. तसेच या सारखे विविध कार्यक्रम आयोजित करून जनतेच्या सेवेसाठी सतत झटत राहणार व जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ मतदारसंघातील जनतेला मिळवून देणार असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.