जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणारी धामणगाव ग्रामपंचायत मध्ये महारुद्र महारनवर यांच्या नेतृत्वाखाली सरपंच पदी ज्योती महारुद्र महारनवर तर उपसरपंच पदी गणेश राजेंद्र थोरात यांची बिनविरोध निवड झाल्याने तिसऱ्यांदा सत्ता राखत विजयाची हॅटट्रिक नोंदवली आहे.
धामणगाव ग्रामपंचायत मध्ये नऊ सदस्य आहेत त्यापैकी महारुद्र महारनवर यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचे सहा उमेदवार बहुमताने निवडून आले होते. या विजयामुळे सलग तिसऱ्यांदा विजय संपादन केल्याने विजयाची हॅटट्रिक केली आहे. सरपंचपदासाठी ज्योती महारुद्र महारनवर यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला होता तर उपसरपंच पदासाठी गणेश राजेंद्र थोरात यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. विहित वेळेत दुसरा अर्ज दाखल न आल्याने सरपंच पदी ज्योती महारुद्र महारनवर यांची तर उपसरपंच पदी गणेश राजेंद्र थोरात यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अभ्यासी अधिकारी एस. एम. मुळे व सहाय्यक एस. एन. मोरे यांनी जाहीर केले. सरपंच व उपसरपंच निवडी जाहिर होताच फटाक्यांच्या व ढोलताशांच्या आतषबाजीने गुलालाची उधलण करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

यावेळी बोलताना पॅनल प्रमुख महारुद्र महारनवर म्हणाले की, मागील दहा वर्षांत केलेल्या विकास कामांमुळे जनतेने परत आमच्यावर विश्वास टाकून बहुमताने आमच्या पॅनलला निवडून दिले आहे. आम्ही जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता गट तट न ठेवता धामणगावचा राहिलेला विकास करण्यास कटिबद्ध आहोत. विकासाबाबत तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण करू असे महारनवर यांनी सांगितले.