जामखेड न्युज – – –
सध्या राज्यभरातील बारावीत शिकत असलेल्या मुलांची परीक्षा सुरु आहे. या परीक्षेसंदर्भात अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. वेळापत्रकानुसार, शनिवार दिनांक १२ मार्च रोजी केमिस्ट्री या विषयाची परीक्षा होती. मात्र, या परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडल्याचं समोर आलं आहे. शनिवारी झालेला बारावी केमिस्ट्रीचा पेपर मुंबईत फुटल्याचा गैरप्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी क्लासेसच्या शिक्षकाला विले पार्ले पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरु आहे. कथित आरोपी मुंबईत खाजगी कलासेस चालवत असून मुकेश यादव असं या शिक्षकाचं नाव आहे. आपल्या वर्गात शिकत असणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना या खासगी शिक्षकानं पेपर सुरु होण्याअगोदरच व्हॉट्सअपवर हा पेपर पाठवला असल्याची माहिती मिळाली आहे.
आतापर्यंत या तीन विद्यार्थ्यांची चौकशी सुद्धा पोलिसांनी केली आहे. मात्र, या शिक्षकाकडे परीक्षेआधीच हा पेपर कोणी दिला? यासाठी किती रुपयांचा तसेच कशा प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला? यापूर्वी त्याने कुठले पेपर विद्यार्थ्यांना दिली आहेत का ? या प्रकारचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
सध्या तरी ही प्रश्नपत्रिका या ३ विद्यार्थ्यांपर्यंत व्हाट्सअपद्वारे पाठवण्यात आली. मात्र, आणखी किती मुलांपर्यंत हा पेपर गेला आहे? हा एक मोठा प्रश्नच आहे. त्यासंदर्भात आता पुढील तपस पोलिसांकडून सुरु आहे.



