जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कर्जत व जामखेड तालुक्यात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सहभागी झालेल्या अनेक रुग्णांवर डोळ्यांच्या विविध शस्त्रक्रिया आणि इतर उपचार करण्याची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या सहकार्याने पुण्यातील नामांकित डी.वाय पाटील रूग्णालयात मतदारसंघातील उपचाराची व शस्त्रक्रियेची गरज असलेल्या तब्बल 167 रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया तसेच इतरही आजारांवरील शस्त्रक्रिया व उपचार दिनांक 2 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले.
या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांवरील जाण्यायेण्याचा व राहण्या-खाण्याचा संपूर्ण खर्च हा कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तसेच रुग्णांवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया ही डी. वाय पाटील रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत करण्यात आली. आरोग्य शिबीराप्रमाणेच नागरिकांसाठी मतदारसंघात अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवत असल्याने आमदार रोहित पवार यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत. येत्या काळातही नागरिकांच्या सोयीसाठी अशा प्रकारे शिबिरे तसेच नागरिकांना लागणारी इतरही मदत पुरवली जाईल, असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.