आमदार रोहित पवारांच्या अथक प्रयत्नांनंतर विजेची अनियमितता सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांना फायदा!!

0
257
जामखेड न्युज – – – 
 आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून कर्जत जामखेड मतदारसंघातील विजेची अनियमितता सुरळीत होण्यास मदत झाली आहे.  विजेचे उपकेंद्र व लिंक लाईन टाकून मतदारसंघातील विजेचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी आमदार रोहित पवार विशेष प्रयत्न करत आहेत. नायगाव येथे 33/11 केव्ही नवीन उपकेंद्राला मान्यता मिळाली असून या नवीन उपकेंद्रामुळे नायगाव, नाहुली, देवदैठण, बांधखडक, आनंदवाडी या गावांतील शेतकऱ्यांना तसेच गावांतर्गत येणाऱ्या वाड्या वस्त्यांना फायदा होणार आहे. तसेच सध्या राजुरी उपकेंद्रातून सुरु असलेल्या नायगाव 11 केव्ही शेती पंप वाहिनीची लांबी ही 18 किलोमीटर असून नवीन उपकेंद्रामुळे ती 8 किलोमीटर कमी होणार आहे. तसेच राजुरी गावठाण वाहिनीची लांबी ही 12 किलोमीटर असून नव्या उपकेंद्रामुळे ती 7 किलोमीटर कमी होणार आहे. दरम्यान, नवीन उपकेंद्रामुळे सध्याच्या उपकेंद्रांवर आलेला ताण कमी होण्यास मदत होणार असून त्यावर अवलंबून असणाऱ्या गावांची गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विजेची अडचणही दूर होणार आहे. त्यासोबतच कर्जत जामखेडमधील सोलार प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे आणि लवकरच ते कामही पूर्णत्वास जाईल व त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.
कर्जत तालुक्यातील 33/11 पाटेवाडी सबस्टेशन येथे ओव्हरलोडींगमुळे आजूबाजूच्या परिसरातील वीज पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. परंतु आमदार रोहित पवार यांच्या आमदार निधीतून पाटेवाडी सबस्टेशन येथे 3 किलोमीटर लिंक लाईनचे काम पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. पाटेवाडी येथे झालेल्या 3 किलोमीटर लिंकलाईनचा फायदा हा आनंदवाडी, हांडाळे, निमगाव व पाटेवाडी येथील शेतकऱ्यांना होणार आहे. अशाच प्रकारे आमदार निधीतून शिंपोरा येथे 4 किलोमीटर लिंक लाईनचे काम तर भांबोरा येथे 3 किलोमीटर लिंक लाईनचे काम प्रगतिपथावर आहे. यामाध्यमातून आजूबाजूच्या एकूण जवळपास 10 गावांच्या विजेचा पुरवठा योग्य दाबाने व नियमित होण्यास मदत होणार आहे. त्याच बरोबर रोहित पवारांच्या आमदार निधीतून जामखेड तालुक्यातील जवळा, हळगाव व नान्नज तसेच पाटोदा, आरणगाव व पिंपरखेडा अशा लिंकलाईनचे कामही सुरू आहे. ज्यामुळे आता विजेची समस्या कायमची मार्गी लागणार आहे.
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नातून लिंक लाईन व उपकेंद्राचे काम सुरू करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून अनेक कामांना गती देखील मिळाली आहे. त्याचबरोबर राशीनमध्ये असलेल्या सबस्टेशनची क्षमता वाढवण्याची परवानगीही आमदारांनी मिळवली आहे आणि येत्या काळात दिघोळ व घुमरी येथील नवीन सबस्टेशनला मंजुरी मिळाली असून लवकरच त्याच्याही कामाला सुरुवात होईल. यामुळे वीज पुरवठा होत असताना ज्या अडचणी येतात त्या सोडवण्यास मदत होणार आहे व मतदारसंघातील विजेचा लपंडाव हा पूर्णपणे संपणार आहे.  शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा यासाठी आमदार रोहित पवार सतत पाठपुरावा करत आहेत. या कामासाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत साहेब, ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे साहेब तसेच जिल्हा व राज्यपातळीवरील अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे.
मतदारसंघात प्रलंबित असलेली अनेक कामे ही रोहित पवार यांच्या सहकार्याने व विविध उपक्रमांच्या माध्यमातून मार्गी लागत असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळत आहे. त्यातच आता विजेची मोठी समस्या असलेले नानाविध प्रश्न मार्गी लावल्याने नागरिकांकडून आमदार रोहित पवार यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच आमदार रोहित पवार यांनीही मतदारसंघासाठी लागणारी सर्वतोपरी मदत माझ्याकडून पुरवली जाईल व विकासाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here