जामखेड न्युज – – –
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत नोव्हेंबरमध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता नाकारता येत आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून ती पुन्हा घ्यावी. तसेच, आतापर्यंत टीईटी उत्तीर्ण झालेल्या ८६ हजार पात्रता धारकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करून बोगस प्रमाणपत्र आढळणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी डी. टी. एड, बी. एड स्टुडंट असोसिएशनने शिक्षण विभागाकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात येते. ही परीक्षा २०१३ पासून घेण्यात येत असून, आतापर्यंत सात वेळा परीक्षा झाली आहे. २०१६ आणि २०१९ मध्ये परीक्षा झालेली नाही. दरम्यान, यंदा २१ नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षा घेतली असून, तिची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध केली आहे. त्या उत्तरसूचीवर विद्यार्थ्यांचे आक्षेप आहेत. सध्या राज्यात दीड ते दोन लाख रुपयांचा व्यवहार करून टीईटी परीक्षा उत्तीर्ण करून देणारे रॅकेट सक्रिय असल्याचे टीईटी परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत पुणे पोलिसांकडून होणाऱ्या तपासातून निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर टीईटी २०२१ च्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये अविश्वास निर्माण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे ही परीक्षा रद्द करावी आणि पुन्हा नव्याने परीक्षा घ्यावी, अशी परीक्षार्थींची मागणी आहे.
‘‘टीईटी परीक्षेत वशिलेबाजी झालेली असल्याची शक्यता आहे, त्यामुळे ही परीक्षा रद्द करून ती पुन्हा घ्यावी. तसेच, आतापर्यंतच्या टीईटी उत्तीर्ण झालेल्या ८६ हजार पात्रता धारकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करावी. बोगस प्रमाणपत्र आढळणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करत गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा’’, अशी मागणी डी. टी. एड, बी. एड स्टुडंट असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष संदीप कांबळे यांनी केली आहे.‘‘आतापर्यंत टीईटी परीक्षेतील समोर आलेला गैरव्यवहार पाहता नोव्हेंबर २०२१मधील परीक्षेच्या प्रलंबित निकालातही गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये झालेली टीईटी परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने घ्यावी. टीईटी गैरव्यवहारप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. या सगळ्या घोटाळ्यात हुशार आणि गरीब विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आतापर्यंत टीईटी उत्तीर्ण झालेल्या पात्रताधारक विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करणेही गरजेचे आहे.’’- इंद्रजित डुमणे, टीईटी परीक्षार्थी, नांदेड