आघाडीला जिल्हापरिषद, पंचायत समितीत घवघवीत यश; रोहित पवार म्हणतात, आता…

0
279
जामखेड न्युज – – – 
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी आघाडी, युतीच्या आकडेवारीत आघाडीने सरशी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यापुढे सर्वच निवडणुकीत मतदारसंघाचा अभ्यास करून आघाडीचा प्रयोग राबवला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपसमोर आघाडीचं तगडं आव्हान उभं राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रोहित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. लोकांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. जनतेचा आघाडी सरकारवर विश्वास वाढला आहे हे निकालातून स्पष्टपणे दिसून येतं. हा प्रयोग यशस्वी होत असेल तर जिथं जिथं महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद निवडणुका आहेत, तिथं त्या त्या मतदार संघाचा अभ्यास करुन हे समीकरण येत्या काळात बहुतांश ठिकाणी वापरलं जाईल. जेव्हा सगळे पक्ष एकत्र लढतात, तेव्हा तिथे असणारे लोकही त्याचा विचार करतात. तिन्ही पक्ष एकत्र आल्याने लोक जनतेच्या बाजूने उभे राहतात हे या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे, असं पवार म्हणाले.
पक्ष सांगेल तिथे प्रचाराला जाईल
आर्थिक ताण असताना सुद्धा महाविकास आघाडी सरकार लोकांच्या बाजूने निर्णय घेत आहे. त्याची जाणीव लोकांना आहे. हे सरकार मदत देत आहे, हे लोकांना समजलं आहे. कोरोना काळात राजकारण न करता या सरकारने जे काम केलं त्याची ही पोच पावती आहे, असं त्यांनी सांगितलं. येत्या काळात महापालिकेबरोबरच अनेक नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणूका आहेत. पक्षाच्या आदेशानुसार जिथं आवश्यकता आहे तिथं प्रचाराला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शरद पवार संतापले
यावेळी त्यांनी लखीमपूर हिंसेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. लखीमपूरमध्ये जे घडलं ते अतिशय वाईट होतं. या घटनेत अंहकार आणि सत्तेची मस्ती दिसते. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना चिरडले गेले आहे ते निषेधार्ह आहे. एवढा अमानूष प्रकार झाल्यावरही केंद्रातले आणि राज्यातले भाजप नेते त्यावर काही बोलत नाहीत. या घटनेचा निषेध करत नाहीत याचं आश्चर्य वाटतं. शरद पवारही या घटनेनंतर खूप संतप्त झाले आहे. म्हणून त्यांनी या घटनेची तुलना जालियनवाला बागेशी केली आहे, असं ते म्हणाले.
केंद्राने तात्काळ मदत करावी
मराठवाडा आणि विदर्भातील अतिवृष्टीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळायला हवी. केंद्राच्या पथकानेही या भागात तात्काळ पाहणी करून मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे, कोणतीही अट न टाकता मदत द्यायला हवी, त्यासाठी राज्य सरकार मदत करेलच, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here