जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे शहरातील इतरही कार्यकर्ते आता भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. अनेकांनी आता तशा भावना व्यक्त करून दाखविल्या आहेत. भाजपाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. त्यात आता ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे अनेक कार्यकर्ते पोरके झालेले आहेत. त्यामुळे आपण कशासाठी आता भाजपात रहायचे असे अनेकजण बोलू लागलेले आहेत. परिणामी नामदेव राऊत यांच्या मागे आता भाजपाचे इतर कार्यकर्तेही पक्ष सोडण्याच्या तयारी आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नामदेव राऊत भाजपाला सोडचिठ्ठी देणार आहेत, अशा चर्चा झडत होत्या. मात्र माजी आमदार राम शिंदे व खासदार सुजय विखे यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष व इतर नेत्यांना समजूनही त्यांनी तालुक्यात येऊन कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. तसेच कार्यकर्त्यांचे मेळावेही घेतलेले नाही.
नेत्यांनाच जर स्थानिक नेत्यांची गरज नसेल तर आपल्या सारख्या कार्यकर्त्यांनी तरी का पक्षात रहावे, अशी चर्चा आता कर्जत तालुक्यात सुरु झालेली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यात भाजपाचे वर्चस्व आता कमी होेऊ लागलेले असून अनेकजण आता आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये काम करण्यासाठी तयार झालेले आहे. नामदेव राऊत यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या वेळीच अनेकजण राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधणार आहे.
तशा हालचाली व काहींनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. नामदेव राऊत यांनी पक्ष सोडल्याची घोषणा केल्यानंतर नेते मंडळींनी त्यावर मत व्यक्त करणे गरजेचे होते. मात्र तसे कोणीच मत व्यक्त न केल्याने त्यांनाच स्थानिक नेत्यांनी पक्षात राहू नये, असे वाटत नाही ना असा सवालही आता उपस्थित करून भाजपाचे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु झालेली आहे.
कर्जतमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे त्याचा फायदा कर्जत नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला होऊन सत्ता स्थापता येणार आहे.