जामखेड न्युज – – – –
टीईटीचा टप्पा पार करत गीता वराट व सायली मुरूमकर यांची शिक्षकपदी झेप, श्री साकेश्वर विद्यालयात यशस्वी लेकींचा थाटात सत्कार!
‘यशाला शॉर्टकट नसतो, जिद्द, चिकाटी आणि सातत्याने प्रयत्न करा’ — सत्कारमूर्तींचा विद्यार्थ्यांना संदेश
टीईटी परीक्षेच्या माध्यमातून शिक्षकपदावर निवड झाल्याबद्दल गीता शिवचंद वराट आणि सायली अरुण मुरूमकर यांचा दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे श्री साकेश्वर विद्यालय, साकत येथे उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. गीता वराट यांची रयत शिक्षण संस्थेत पदवीधर शिक्षिका म्हणून, तर सायली मुरूमकर यांची नाशिक जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

या सत्कार समारंभातून विद्यार्थ्यांसमोर मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर यश मिळविण्याचा आदर्श निर्माण झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्याचे आवाहन केले.

सत्काराला उत्तर देताना गीता वराट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. अपयश आले म्हणून खचून जाऊ नका. सतत प्रयत्न करत राहा. जिद्द, चिकाटी आणि सातत्य हे यशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.” विद्यार्थ्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करून ध्येयाकडे वाटचाल करावी, असेही त्यांनी सांगितले.
सायली मुरूमकर यांनीही आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना सांगितले की, “अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. एखाद्या प्रयत्नात अपयश आले तरी निराश न होता पुन्हा प्रयत्न करत राहा. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे यश नक्कीच मिळते.”

ज्ञानदेव मुरूमकर यांनी गीता वराट आणि सायली मुरूमकर यांच्या यशाचे कौतुक करताना जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळाल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास केला, तर यश निश्चित मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बाळासाहेब वराट यांनी विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत चिंता व्यक्त केली. मुलींमध्ये अभ्यासाची आवड आणि मेहनत दिसून येते, असे सांगत विद्यार्थ्यांनीही अभ्यासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.



