जामखेड न्युज – – – – – –
दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या बळीराजासाठी शिवसेना मैदानात!
जामखेडमध्ये ‘शेतकरी मदत केंद्र’ सुरू
७२ पेक्षाही परिस्थिती अधिक गंभीर’ — राजेंद्र दळवी
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जामखेड येथे ‘शेतकरी मदत केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यात या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी दिली.

सध्या जामखेड तालुक्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत चालली असून शेतकऱ्यांसमोर पाणी, चारा, पीक नुकसान आणि आर्थिक अडचणींचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती मिळावी, विविध योजनांचे अर्ज भरताना अडचणी येऊ नयेत आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळावा, यासाठी हे मदत केंद्र कार्यरत राहणार आहे.

मदत केंद्रातून कोणत्या सुविधा मिळणार?
या केंद्रामध्ये शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांसंदर्भात मोफत मार्गदर्शन व अर्ज प्रक्रियेसाठी मदत केली जाणार आहे. त्यामध्ये —
पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यास मदत
कर्जमाफीसंदर्भात मार्गदर्शन
अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाईसाठी अर्ज प्रक्रिया
७/१२, ८-अ, फेरफार आदी महसूल विषयक कामांसाठी मार्गदर्शन
पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची माहिती
जनावरांच्या विम्याबाबत मार्गदर्शन
शेती अवजारे व विविध कृषी योजनांवरील अनुदानाची माहिती
पाणी व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासकीय मदतीसाठी पाठपुरावा
यांचा समावेश आहे.

‘७२ पेक्षाही परिस्थिती अधिक गंभीर’ — राजेंद्र दळवी
यावेळी शिवसेना अहिल्यानगर दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी जामखेड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्याचा दुष्काळ हा १९७२ च्या दुष्काळापेक्षाही अधिक कठीण असल्याचे शेतकऱ्यांना जाणवत आहे. त्या काळात लोकसंख्या आणि पशुधन तुलनेने कमी होते; मात्र आज लोकसंख्या वाढली असून पशुधनाची संख्याही मोठी आहे. शेतीचे क्षेत्र तुलनेने तेवढेच असताना पाणी आणि चाऱ्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात पाणी व चारा टंचाईचे संकट अधिक गंभीर होऊ शकते.





