जामखेड न्युज – – –
महाराष्ट्रातील युवक मोठ्या प्रमाणात सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न पाहत असतात. भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी विद्यार्थी आणि तरुण सातत्यानं प्रयत्न करत असतात. इंडियन आर्मीच्यावतीनं देशभर भरती प्रक्रिया राबवली जाते. या भरती प्रक्रियेचा भाग म्हणून अहमदगर येथे होणारी सैन्य भरती लांबणीवर टाकण्यात आली आहे.
सैन्यभरतीत कोणती पद रिक्त?
सदरील भरती सोल्जर जनरल ड्युटी, नर्सिगं असिस्टंट आणि सोल्जर क्लार्क, सोल्जर ट्रेडसमन आणि सोल्जर टेक्निकल या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. भरतीची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असं इंडियन आर्मीच्या पुणे येथील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
भरती लांबणीवर का टाकण्यात आली?
इंडियन आर्मीच्या वतीनं अहमदनगरमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे सैन्य भरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. 7 सप्टेंबर ते 23 सप्टेंबंर दरम्यान सैन्य भरती घेण्यात येणार होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आणि कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याची माहिती पुणे येथील लष्कराचे जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितलं आहे.
अधिक अपडेटसाठी वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन
इंडियन आर्मीच्या वतीनं अहमदनगर सोबत तिरुचिरापल्ली, वाराणसी येथील सैन्य भरती देखील लांबणीवर टाकली आहे. याठिकाणच्या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांनी इंडियन आर्मीच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर भरतीच्या पुढील तारखा जाहीर केल्या जातील.






