Monday, August 24, 2026
Home क्राईम न्यूज जामखेडमध्ये जमिनीच्या नावाखाली दरोडा! बोलावून मारहाण, 3.64 लाख लुटले, टोळीत एका महिलेचाही...

जामखेडमध्ये जमिनीच्या नावाखाली दरोडा! बोलावून मारहाण, 3.64 लाख लुटले, टोळीत एका महिलेचाही समावेश

0
2
जामखेडमध्ये जमिनीच्या नावाखाली दरोडा! बोलावून मारहाण, 3.64 लाख लुटले, टोळीत एका महिलेचाही समावेश

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेडमध्ये जमिनीच्या नावाखाली दरोडा! बोलावून मारहाण, 3.64 लाख लुटले, टोळीत एका महिलेचाही समावेश

 

 

वडील अजारी आहेत, पैशाची गरज आहे त्यामुळे आम्हाला शेती विकायची आहे. या बहाण्याने श्रीरामपूर येथील दोघांना नान्नज परिसरातील बऱ्हाणपूर जवळील शेतात बोलवून लाथा बुक्क्यांनी मारहाण करित सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम व मोबाइल असा एकुण 3 लाख 64 हजार रुपयांना चार जणांच्या टोळक्याने लुटले. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला एका महीलेस एकुण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर येथिल रहीवाशी आसलेले कलिम अवद बिनसाद (वय ४३, रा. शैलाणी बाबा दर्ग्याजवळ, वॉर्ड क्रमांक ३, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांनी जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की फीर्यादी कलिम बिनसाद हे श्रीरामपूर शहरात बॅग शॉपी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तसेच ते ‘महारक्षक सिक्युरिटी फोर्स प्रा. लि.’ चालवतात. याशिवाय श्रीरामपूर येथे ‘ग्लोबल करिअर अकॅडमी’ चालवून मुलांना भरतीपूर्व प्रशिक्षण तसेच मैदानी प्रशिक्षण देण्याचे काम करतात. त्यांच्या सिक्युरिटी फोर्समध्ये मागील सुमारे एक वर्षापासून आरोपी हिना शबीर शिंदे (रा. टोलनाक्याजवळ, पाटोदा, ता. पाटोदा, जि. बीड) ही काम करत असल्याने तिची फिर्यादीशी ओळख होती.

दि १९ ऑगस्ट २०२६ रोजी कलिम बिनसाद यांच्या सिक्युरिटी फोर्समधील पार्टनर ज्ञानेश्वर महादेव घायतडक (रा. घायतडकवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांना आरोपी हिना शबीर शिंदे हिचा फोन आला. तिचे वडील आजारी असल्याने त्यांच्या उपचारासाठी जमीन विकायची असल्याचे तिने सांगितले. जमीन पाहून घेण्याचे तसेच जमीन पसंत पडल्यास कमी-जास्त करून देण्याचे सांगत, येताना जमिनीसाठी इसार म्हणून काही रक्कम घेऊन येण्यास फीर्यादीस तिने सांगितले. 

त्यानंतर २३ ऑगस्ट २०२६ रोजी हिना शबीर शिंदे हिने पुन्हा ज्ञानेश्वर घायतडक यांना फोन करून जामखेड येथे जमीन पाहण्यासाठी बोलावले. त्यानुसार कलिम बिनसाद व त्यांचे मित्र ज्ञानेश्वर घायतडक हे त्यांच्या चारचाकी आय-२० कार क्रमांक एमएच २४ ए. एफ २५२० मधून जामखेड येथे आले. जामखेड येथे आल्यानंतर हिना शिंदे हिला फोन केला असता तिने तिच्या मोबाईलवरून खर्डा रोड, जामखेड येथील लोकेशन पाठवून तेथे बोलावून घेतले. तेथे हिना शिंदे हिची त्यांच्याशी भेट झाली. त्यावेळी तिच्यासोबत एक पुरुष व्यक्ती होती.

या व्यक्तीने फीर्यादी व साथीदार यांना त्यांच्या मोटारसायकलच्या मागे येण्यास सांगितले. त्यानंतर कलिम बिनसाद व ज्ञानेश्वर घायतडक हे त्या व्यक्तीच्या मोटारसायकलच्या मागे नान्नज व चोभेवाडीमार्गे बऱ्हाणपूरच्या पुढील रस्त्याने गेले. दुपारी सुमारे १२ वाजता बऱ्हाणपूर परिसरात हिना शिंदे हिने आंब्याचे शेत दाखवले. त्यानंतर त्यांनी आपली चारचाकी गाडी उभी करून शेतात प्रवेश केला. तेथे कलिम बिनसाद व ज्ञानेश्वर घायतडक हे दोघे उभे असताना हिना शिंदे हिच्यासह तिच्या सोबत असलेल्या अन्य तीन व्यक्तींनी त्यांना पकडले. यानंतर या चारही जणांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर कलिम बिनसाद यांच्या जवळ असलेली ३ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. तसेच त्यांच्या अंगावरील चांदीच्या दोन अंगठ्या, एक घड्याळ आणि मोबाईल काढून घेतला.
याशिवाय कलिम बिनसाद यांचे मित्र ज्ञानेश्वर घायतडक यांच्या खिशातील ३० हजार रुपये रोख रक्कम व विवो कंपनीचा मोबाईल देखील काढून घेतला. असा एकुण ३ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल काढुन घेतला. त्यानंतर संबंधितांनी, “तुम्ही येथे थांबायचे नाही, नाहीतर तुम्हाला जीव मारू,” अशी धमकी दिली. त्यानंतर सर्वजण घटनास्थळाहुन निघून गेले.

यानंतर फीर्यादी कलिम बिनसाद व ज्ञानेश्वर घायतडक हे त्यांच्या चारचाकी वाहनातून पुन्हा जामखेड येथे आले व घडलेला सर्व प्रकार पोलीसांना सांगितला. या घटनेबाबत कलिम बिनसाद यांनी दि २४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित महीला व तीचे तीन साथीदार अशा एकुण चार जणांविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे हे करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!