जामखेड परिसरात कर्णकर्कश आवाजांनी नागरिक भयभीत, प्रशासन मात्र अनभिज्ञ!
जामखेड शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून अचानक होणाऱ्या कर्णकर्कश आणि घरे हादरवून सोडणाऱ्या आवाजांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः सकाळी व सायंकाळी अचानक मोठा आवाज होत असल्याने नागरिक दचकून जागे होत असून, या आवाजांचे नेमके कारण काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आवाजाचे गुढ मात्र कायम आहे.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून, हा आवाज नेमका कुठून आणि कशामुळे होत आहे, याचा शोध घेण्याची मागणी होत आहे. आवाजाची तीव्रता इतकी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे की, काही ठिकाणी घरांच्या खिडक्या-दारे हादरल्याचा अनुभव नागरिकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी या गंभीर प्रकाराची तहसीलदार शितल सावळे व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या कडे विचारणा केली आहे. मात्र त्यांच्या कडे याबाबत काहीही माहिती नसल्याचे समोर आले परिसरात वारंवार मोठे आवाज होत असताना प्रशासनाला याबाबत कोणतीही ठोस माहिती नसणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या आवाजांमागे नेमके कारण काय आहे, त्याचा नागरिकांच्या सुरक्षिततेवर काही परिणाम होण्याची शक्यता आहे का, तसेच परिसरात कोणतीही परवानगी असलेली अथवा अन्य स्वरूपाची गतिविधी सुरू आहे का, याची प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“नागरिक भयभीत होत असताना प्रशासन अनभिज्ञ कसे?” असा सवाल उपस्थित करत संजय कोठारी यांनी संबंधित विभागांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या आवाजांचे गूढ लवकरात लवकर उकलून नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी प्रशासनाने अधिकृत माहिती जाहीर करावी, अशी अपेक्षा जामखेडकरांकडून व्यक्त होत आहे.